Spread the love

प्रकाश आवाडे दोन वेळा; राहुल आवाडे तिसरे

सुभाष भस्मे/महान कार्य वृत्तसेवा-
इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात आजपर्यंत विजयी झालेल्या आमदारांमध्ये नुकतेच विजयी झालेले भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 1972 पासून झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दोन वेळा एक लाखांचा आकडा पार केला होता तर त्यांचा विक्रम तोडत आमदार राहुल आवाडे यांनी 2024 च्या निवडणुकीत हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

इचलकरंजी विधानसभा निवडणुकीचा आजपर्यंतचा निकाल पाहिला तर केवळ तीनच उमेदवारांनी 1 लाखांपेक्षा पेक्षा अधिक मते घेतल्याचे समोर येत आहे. 1972 पासून या मतदारसंघाचा राजकीय आढावा घेतला तर प्रकाश आवाडे यांनी दोन वेळा 1 लाखांहून अधिक मते तर राहुल आवाडे यांनी एक वेळा 1 लाखांहून अधिक मते घेतली आहेत. भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दोन निवडणुकांमध्ये 90 हजारांहून अधिक मते घेतली आहेत.
इचलकरंजी विधानसभेचे प्रतिनिधित्व आजपर्यंत अनेक दिग्गजांनी केले आहे. यामध्ये देशभक्त बाबासाहेब खंजिरे, कॉम्रेड एस. पी. पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कॉम्रेड के. एल. मलाबादे यांनी प्रत्येकी 1 वेळा, भाजपचे सुरेश हाळवणकर यांनी सलग 2 वेळा तर प्रकाश आवाडे यांनी तब्बल 5 वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता या मतदारसंघाची धुरा मतदारांनी डॉ. राहुल आवाडे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. अत्यंत संवेदनशील मानणारा हा मतदारसंघ सहकार आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजीतील मतदारांनी राहुल आवाडे यांना तब्बल 1 लाख 31 हजार 919 इतकी विक्रमी मते त्यांच्या पारड्यात घातली. आजपर्यंतच्या विधानसभेच्या निकालाची आकडेवारी पाहता राहुल आवाडे यांना पडलेले हे मतदान सर्वाधिक आहे. यापूर्वी 2004 साली प्रकाश आवाडे यांना 1 लाख 7 हजार 846 आणि 2019 साली 1 लाख 16 हजार 886 इतकी मते मिळाली होती. त्यामुळे 1 लाखांहून अधिक मतांचा टप्पा पार करणारे आवाडे पिता-पुत्र आहेत. त्यातही 2004 आणि 2019 च्या मतांचा विक्रम यंदा डॉ. राहुल आवाडे यांनी मोडत यावर आपले नाव कोरले आहे.

साल ! आमदार ! पक्ष ! मिळालेली मते
1972- बाबासाहेब खंजिरे – नव काँग्रेस – 46967
1978- कॉ. एस. पी. पाटील – कम्युनिस्ट – 38206
1980- कल्लाप्पाण्णा आवाडे – काँग्रेस – 44104
1985- प्रकाश आवाडे-काँग्रेस – 51791
1990- कॉ. के. एल. मलाबादे – माकप – 79600
1995- प्रकाश आवाडे – काँग्रेस – 82086
1999- प्रकाश आवाडे – काँग्रेस – 64365
2004- प्रकाश आवाडे – काँग्रेस – 107846
2009- सुरेश हाळवणकर – भाजप – 90104
2014- सुरेश हाळवणकर – भाजप – 94214
2019- प्रकाश आवाडे – अपक्ष – 116886
2024- राहुल आवाडे – भाजप – 131919