‘‘उमेदवारीचा संघर्ष ते विजयाचा गुलाल’’
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
2019 च्या विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतरसुद्धा गेल्या पाच वर्षांत बापूंना आमदार करणारच हा चंग बांधून गल्ली ते मुंबई अशा सगळ्या जोडण्या लावून संघर्ष पाचविला पुजलेला असतानासुध्दा अशोकराव माने बापूंची खिंड निर्वीवादपणे लढवणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून धनंजय टारे या नावाची चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकरणात चालू असून अशोक मानेंच्या विजयात टारे यांची चाणक्य निती महत्वाची ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वच पक्षातील नेते मंडळींसोबत चांगले संबंध ठेवत धनंजय टारे यांनी आ. अशोकराव माने यांच्याबद्दल आदरभाव निर्माण केला. मागील विधानसभेतील पराभवानंतर टारे यांनी सुहास राजमाने, विजयसिंह माने, संदीप कारंडे, अदित्य सुर्यवंशी या मंडळींची टीम तयार करत पडद्यामागुनच सर्व यंत्रणा हाताळली, म्हणूनच की काय मागच्या विधानसभेला अशोक मानेंनी घेतलेल्या 44 हजारच्या मताधिक्यापेक्षाही जास्त मतांची आघाडी यंदा अशोकराव मानेंनी घेतली. हे यश धनंजय टारे यांच्या टीमचेच आहे हे त्रिवार सत्य नाकारून चालणार नाही.
राजकारण म्हटल्यानंतर अनेकांचे रूसवे फुगवे ठरलेलेच. मात्र गेल्या पाच वर्षात या पठ्ठ्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते जिल्ह्यातील माजी मंत्री विनयरावजी कोरे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आ. महादेवराव महाडीक, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, खा. धैर्यशील माने या नेतेमंडळींना आ. अशोकराव माने यांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे करण्यात धनंजय टारे यांचाच सिंहाचा वाटा होता. मागील पराभवातील अनेक त्रुटींचा अभ्यास करून मागील पाच वर्षांत अशोकबापूंना मतदार संघातील घराघरांत पोहचवण्याचे काम त्यांच्या सुक्ष्म नियोजनाने सिद्ध झाले आणि म्हणूनच संघर्ष पाचविला पुजलेला असताना सुध्दा बापूंना आमदार करण्यात धनंजय टारे यांचा सिंहाचा वाटा आहे हे सिद्ध झाले आहे.
58 गावांचा समावेश असलेल्या हातकणंगले विधानसभा मतदार संघात आपल्या संपर्काच्या जोरावर जिव्हारी लागलेल्या अशोक मानेंचा 2019 च्या पराभवाचे विजयात रूपांतर करणं हे जेवढ अवघड होतं, तेवढच जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडामोडी, निर्माण झालेली महायुती आणि त्यात बापूंना करावा लागणारा उमेदवारीचा संघर्ष पण.. योग्य नियोजन लावत ताकदीने मिळवलेली उमेदवारी राजकीय मंडळींना सुध्दा बुचकळ्यात टाकणारी ठरली. बापूंना आमदार करणारच या ध्येयाने पछाडलेला एक युवक पाच वर्ष पायाला भिंगरी लाऊन मतदार संघात फिरतो, मतदार संघातील कार्यकर्त्यांची नाळ आणि राजकीय परस्थिती यांची सांगड घालतो आणि ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळतो हि जरी सोपी वाटणारी गोष्ट नसलीतरी देखील आपल्या व सहकार्यांच्या जोरावर धनंजय टारे यांनी हे करून दाखवले आहे.
पराभवानंतरही बापू सावकरांसोबत एकनिष्ठ राहिले. दरम्यानच्या काळात जिल्हयात अनेक राजकीय घडामोडीही घडल्या. याही खडतर परस्थितीत माजी मंत्री विनयरावजी कोरे यांना माणगांव गावांत आणून आदर्श सरपंच राजु मगदूम यांच्यासह अनेक नेतेमंडळींना अशोक माने यांच्या पाठीशी उभे करण्यात टारे यशस्वी झाले आणि इथूनच अशोक माने यांच्या विजयाची मुहूर्तमेढ झाली. हिच चाणक्य निती अशोक मानेंना विधानसभेत जाण्यास महत्वाची ठरली.
याच राजकीय चाण्यक्याची चर्चा जिल्ह्यात नाही तर मुंबईपर्यंत पोहचली आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या चाण्यक्याची दखल घेतली. राज्यात महायुतीची सत्ता जरी आली असली तरी देखील संघर्षाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वावर नियोजनबध्द जोडण्या लावत विजयी ठरलेला धनंजय नक्कीच इथून पूढच्या जिल्हयाच्या राजकारणाचा दूवा असणार हे नक्कीच …!!