उत्पादन शुल्कचा अलिखित परवाना; बार मालकांची चांदी; चढ्या भावाने दारुची विक्री
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात विधानसभा निवडणूक मतदानाच्या अगोदर निवडणूक आयोगाने वाईन शॉप, देशी दारु आणि बिअर बार 48 तास अगोदर बंद केले. मात्र या काळातही इचलकरंजी, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात बिअर बारमधून खुलेआम दारुची विक्री सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यासाठी शटरला कुलप लावण्यात आले. मात्र बारची एक़ खिडकी सुरु ठेवून दारुची सरसकट विक्री सुरु आहे. यासाठी उत्पादन शुल्क अधिकार्यांशी अर्थपूर्ण चर्चा झाली असावी, अशी दबक्या आवाजातील चर्चा इचलकरंजीतील लक्ष्मी प्रोसेसच्या समोरील चौकात आहे.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने काट्याची लढत होत आहे. कधी नव्हे इतकी इर्षा प्रचारादरम्यान पहावयास मिळाली. जाहीर प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व मद्यालये मतदानापूर्वी 48 तास अगोदर बंद करण्याचे आदेश दिले. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी संबधीत बार मालकांना नोटीस बजावून आदेशाचे पालन करण्याच्या सूचनाही केल्याचे समजते. या निर्णयामुळे देशी, विदेशीची विक्री करणार्या बार मालकांची चांगलीच पंचायत झाली.
उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांची चांदी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे कागदोपत्री सोपस्कर पूर्ण करुन उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी कमिशन बेसवर बार मालकांना एक खिडकी सुरु ठेवण्याची परवानगी दिल्याचे बोलले जात आहे. यात पोलिसांसाठी हातशिल्लक ठेवल्याचे कळते. यातून वाढीव दराने दारु विकून तळीरामांचा खिसा कापला जात असलातरी उत्पादन शुल्क आणि पोलिसांचा खिसा मात्र गरमा-गरम होत असल्याचे बोलले जात आहे.
बार बाहेरील सीसीटिव्ही ऑफ
एक खिडकीतून राजरोसपणे दारु विकली जात आहे. यासंदर्भात काही तक्रारी झाल्याच तर प्रकरण अंगलट येवू नये म्हणून बार बाहेरील आणि आतील सीसीटिव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याचे कळते. कदाचित उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी अशी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असाव्यात अशी चर्चा आहे.