Spread the love

रुई येथील कार्यकर्ता मेळाव्यात माजी खास . राजू शेट्टी यांचा घणाघात

रुई / महान कार्य वृत्तसेवा

        राज्यासह देशातील राजकीय संस्कृती बिघडली आहे . सध्या राजकारणात टोळीयुद्ध सुरू असून राज्यातील २०० ते २५० घराणी सत्ता असेल तिकडे जात आहेत . सध्या सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून सत्ता मिळवायच्या व्यवसायातून आमदार खरेदी-विक्री सुरू आहे . तो पैसा आपल्याच खिशातील आहे . तरी याचा बिमोड करून पायबंद घालण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिणचेकर यांना विजयी करा . रुई (तालुका हातकणंगले) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते .मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सलीम मुजावर होते .

         महायुती सरकारच्या काळात शेतीसह सर्वच क्षेत्राची वाताहात झाली आहे . अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत . छोट्या उद्योगांना चालना दिली जात नाही. कर्जमाफी केली जात नाही. उलट उद्योगपती अदानी अंबानींची कर्जमाफी  करून सामान्य नागरिकांवर सरकार अन्याय करीत आहे.

             यावेळी उमेदवार डॉक्टर सुजित मिणचेकर म्हणाले , हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील मिणचे गावचा मी स्थानिक रहिवासी आहे . आता बाहेरून पार्सल आणायचे आपण बंद करायला पाहिजे . आपल्याला इचलकरंजीचे पण पार्सल नको आणि शिरोळचे पण पार्सल नको.  हातकणंगले व शिरोळ  मतदार संघातील जनता मला व उल्हास पाटील यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही . गेल्या दहा वर्षांमध्ये महायुती सरकारने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकासाठी  व इंदू मिल जागेवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी साधी एक वीट सुद्धा लावलेली नाही . ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे . तसेच ही लाजिरवाणी गोष्ट आहे . अशा सरकारला निवडून द्यायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे .  ह्या सरकारला साथ देणाऱ्या आमदारांनाही धडा शिकवण्याचे काम करणे ही काळाची गरज आहे .

         कार्यकर्ता मेळाव्यास माजी जि. प. सदस्य कुमार खुळ, तालुकाध्यक्ष आप्पासो एडके, पंचायत समिती सदस्य अरुण मगदूम, ॲडव्होकेट सुरेश पाटील, पुरंदर पाटील, महावीर हुल्ले, सर्जेराव पाटणकर, रावसाहेब आबदान, कुमार जगोजी, अविनाश शिंदे, जिवंधर बलवान, सुनील वडगावे, मुनीर जमादार, प्राध्यापक राजगोंड पाटील, अशोक मुंडे सर, सुनील पाटील व आनंदा किल्लेदार यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, शिवशक्ती व भीमशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मिणचेकर प्रेमी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.