Spread the love

व्यवहार पूर्ण केला नाहीस….
बनावट नोटा प्रकरणातील आरोपी सोडण्यासाठी पैशांची मागणी
इचलकरंजीतील पोलीस अधिकार्‍याची ऑडीओ क्लिप व्हायरल

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
हॅलो… सलीम मी पी. आय. सूर्यवंशी बोलतोय.. शहापूर पोलीस स्टेशन. काय तुम्ही ‘तो’ व्यवहार पूर्ण करणार आहे की नाही.. तुम्ही शब्द दिला होता… कबूल केले होते की या व्यवहाराला पाच तारखेला आम्ही पूर्ण करतो. साहेब… हा डुप्लिकेट नोटांचा विषय आहे. मी काय पैसे देणार नाही. मी एक गावातला चांगला माणूस आहे. म्हणून मी मध्यस्थी केली आहे. त्यांना सोडवण्यासाठी मी आलो होतो. ठीक आहे..तू कुठे आहेस… पोलीस स्टेशनला ये… तुला काय आहे ते सांगतो… इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी आणि सलीम नामक मध्यस्थी केलेल्या इसमातील संवादाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अशा संवादाच्या चार क्लिप व्हायरल झाल्या आहेत. एक लाख रुपये माच्छरेसाहेब यांना दिले आहेत, उर्वरित व्यवहार पूर्ण करावा अन्यथा आरोपी ताब्यात द्यावेत. असे एका अधिकार्‍याने सलीम यांना सांगितल्याचे एका व्हायरल ऑडिओमध्ये आहे. त्यामुळे आरोपी सोडविण्यासाठी नेमका किती व्यवहार झाला याची चर्चा सुरू होती. दरम्यान, कुरूंदवाड पालिकेतील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पैसे खाण्यातील व्हायरल क्लिपचे प्रकरण ताजे असतानाच आता शहापूर पोलीस ठाण्यातील या क्लिपमुळे वरिष्ठ अधिकार्‍यांबाबत तीव्र संताप लोक व्यक्त करत आहेत.
सांगली व कर्नाटक येथे बनावट नोटांचे नुकतेच प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता, यासंदर्भात सांगलीसह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. प्रकरण इचलकरंजीशी संबंधित असल्याने या आरोपींना शहापूर पोलीस ठाण्यात आणले होते, असे कळते. आरोपी सोडून देण्यासाठी 3 ते 4 लाखाला सौदा ठरला होता. यातील 1 लाख रुपये पोलिसांना पोहचलेही. परंतु, व्यवहारातील उर्वरित रक्कम मागण्यासाठी सलीमकडे पोलील ठाण्यातील ‘कलेक्टर’ने तगादा लावल्याचे या व्हायरल क्लिपनंतर इचलकरंजीत चौका चौकात बोलले जात आहे.
दरम्यान सोळा लाख रुपयाच्या बनावट नोटांचे प्रकरण असल्याचेही बोलले जात आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये सेंट्रल पार्क, वसीम, गावडा, अहमदनगर ड्युटी, डायमंड आदी शब्दप्रयोगही आहेत. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचेही बोलले जात आहे.

होय सलीमला मीच फोन केला होता…
याबाबतची सत्यता तपासण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सलीमला मीच फोन केल्याचे सांगितले. परंतु या प्रकरणाशी शहापूर पोलिसांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. सदरचा प्रकार हा पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार असून याबाबत कारवाई करण्याची काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.