Spread the love

शिरोळ: प्रतिनिधी

बौद्ध समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी रमाबाई हाउसिंग सोसायटी येथे एक कोटी रुपये खर्चून बहुउद्देशीय हॉल बांधला जाईल, अशी घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नुकतीच केली. ते झेंडा चौक मित्र मंडळाने आयोजित केलेल्या विविध मान्यवरांच्या सत्कार आणि ध्वजारोहण समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. प्रमुख अतिथी आमदार यड्रावकर यांनी मुख्य चौकात ध्वजारोहण केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी बौद्ध समाजासाठी सांस्कृतिक हॉल तयार करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या मते, या हॉलमुळे बौद्ध समाजाच्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक गरजांची पूर्तता होईल. त्यांनी याआधी कुरुंदवाड शहरातील बौद्ध समाजासाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर केल्याचेही सांगितले. तसेच तालुक्यातील 20 गावांतील बौद्ध समाजाच्या विकासासाठी अनुसूचित जाती बौद्ध समाजाच्या विकास योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रत्येक गावाला 25 लाख रुपये निधी दिला जाईल.

कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने रणजीत सिंह पाटील, विजय आरगे, बाबा पाटील, विजयसिंह देशमुख, सुभाष कांबळे, भारत ढाले, शिवाजी कांबळे, सुरज कांबळे, दत्ता कांबळे, वायरमन शेखर कांबळे, परसराम कांबळे, बी. आर. कांबळे, अमोल शिरोळकर ऋषक्रांती कांबळे शोभा कांबळे भारती कांबळे, नीलम कांबळे, वासंती कांबळे, कमल ढाले, उज्वला करणे, लता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार दगडू माने यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र प्रधान यांनी केले. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याबद्दल सेनापती भोसले यांचा आणि अन्य मान्यवरांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.