मुंबई 6 मे
लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोग राजकीय नेते व राजकीय पक्षांच्या प्रत्येक हालचालीवर व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहे. आचारसंहितेचा भंग होत नसल्याची दखल आयोगाकडून घेतली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर कायम आहे. मात्र, तरीही दर निवडणुकीप्रमाणे यावेळेसही मोठ्या प्रमाणात अवैध रक्कम आढळून आली आहे. ईडीने टाकलेल्या धाडीत झारखंड येथील एका काँग्रेस मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी जवळपास 20 ते 30 कोटींची रोकड आढळली आहे. या प्रकारामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने रांची, झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. त्यातच झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त केली आहे. ही रोकड 20 ते 30 कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत.
या प्रकरणी ईडीने अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर फेब्रुवारी 2023 मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड काळ्या पैशाचा भाग असल्याचं ईडीचं मत आहे.
कोण आहे आलमगीर आलम?
आलम हे पाकूर विधानसभेचे चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामविकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा वारसा घेत आलमगीर यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. 2000 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.