नागपूर 6 मे
निवडणुकांची रणधुमाळी तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमची मोठ्या प्रमाणात मागणी होते. त्यामुळे देशभरात सध्या साखरेची प्रचंड मागणी आहे. मात्र केंद्र सरकारने निवडणुका लक्षात घेता मे महिन्यात साखरेच्या कोट्यात भरघोस वाढ केलेली आहे. यामुळे ग्राहकांना आता घरातील डाळ-धान्यासह साखरेच्या महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. साखरेच्या दरवाढीने किचनमधील गोडवा कमी केला असल्यामुळे सामान्यांना गोडधोड करुन तोंड गोड करणेही आता परवडणार नाही. त्यांना साखरेसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.
सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढीस आळा बसावा म्हणूनच हा निर्णय घेतला असून त्याला ‘इलेक्शन कोटा’ असे म्हटले जाते. केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला साखरेचा कोटा जाहीर करीत असते. मे महिन्याचा कोटा केंद्राकडून जाहीर केला असून तो कोटा मुबलक असल्याने साखरेच्या दरात प्रतिकिलो एक ते दोन रुपयांची घसरण अपेक्षित होती. मात्र, सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या त्या मनसुब्याला धक्का बसला आहे.
विशेषत: मागील महिन्यात साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने प्रतिकिलो दोन ते अडीच रुपये भाव वाढले होते. इलेक्शन कोट्यानुसार या दरात उतार होण्याऐवजी साखरेचे भाव प्रतिकिलो एक रुपयांनी वाढले आहे. तर लवकरच साखरेच्या दरात सरासरी दोन रुपयांची वाढ होईल अशी चर्चा व्यापारीवर्गात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता केंद्र सरकारने तब्बल 27 लाख टन साखर खुली केली. कोटा जाहीर होताच भाव कमी होण्याची शक्यता होती. मात्र, त्यात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोटा आणि मागणी लक्षात घेता साखरेच्या बाजारात साठेबाज सक्रिय झाल्याची चर्चा आहे. तसेच अजूनही प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ होण्याची शंका वर्तवण्यात येत आहे.