Spread the love

मुंबई 6 मे

मे महिन्यात शाळ-कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळे अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. निसर्गाने नटलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील धबधब्यांना भेटी देण्यासाठी मुंबई, ठाण्यातील पर्यटक येतात. मात्र, कधी कधी पर्यटकांचा अतिउत्साहपणा जीवावर बेततो. असाच एक प्रकार जव्हारमध्ये घडला आहे.

जव्हार मधील प्रसिद्ध असलेल्या दाभोसा धबधब्यात 120 फुटांवरून दोन पर्यटकांनी उड्या मारल्या. त्यात एका पर्यटकाचा धबधब्यातील डोहात बुडुन मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही पर्यटक मिरा रोड आणि काशिमिरा परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे.

माज शेख असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर जोएफ शेख असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी पर्यटकावर जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही पर्यटकांचा 120 फुटांवरुन उडी मारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर अनेक पर्यटनाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा या व्हिडिओची सत्यता पडताळून न पाहता त्या ठिकाणावर जातात. यामुळे अनेकदा दुर्घटना घडण्याच्या शक्यता असतात. महिनाभरातच जव्हारच्या धबधब्यांवर अशा प्रकारे दुर्घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणत्या अनोळख्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असताना खबरदारी घेणे आणि त्या परिसराची संपूर्ण माहिती गोळा करुनच मग प्रवासाला जा, असे अवाहन करण्यात येत आहे.