मुंबई 6 मे
भारताचा माजी वेगवान गोलंदाजा इरफान पठाणने चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. रविवारी झालेल्या चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्स दरम्यानच्या सामन्यामध्ये धोनी चक्क 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्याने इरफान पठाण चांगलाच संतापल्याचे दिसून आले. धरमशाला येथील मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदाच धोनी त्याच्या टी-20 करिअरमध्ये 9 व्या क्रमांकावर खेळायला आला आणि शुन्यावर बाद झाला.
धोनी शून्यावर बाद
पंजाबचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने धोनीला शून्य धावांवर क्लिन बोल्ड केले. धोनी एवढ्या तळाशी फलंदाजीला आल्याने संतापलेल्या इरफानने धोनीला सुनावले आहे. धोनीने वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू म्हणून जबाबदारी स्वीकारुन आधीच्या क्रमांकावर फलंदाजीस यावे असे म्हटले आहे. धोनीने 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करणे हे सीएसकेसाठी फायद्याचे नाही. याचा संघाला काहीच फायदा होत नाही. मला माहिती आहे की तो 42 वर्षांचा आहे. मात्र, त्याची कामगिरी आजही उत्तम आहे. त्याने जबाबदारी घेऊन वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे, असे इरफान पठाण म्हणाला.
पठाणने पुढे म्हणाला, धोनीने किमान 4 ते 5 ओव्हर फलंदाजी करायला हवी. तो सामन्यातील शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फलंदादजी करतो. मात्र, दिर्घकालीन विचार केल्यास याचा सीएसकेला काही फायदा होत नाही, असेही म्हटल्याचे वृत्त आहे. धोनीने यंदाच्या पर्वात तशी समाधानकारक कामगिरी केली आहे. त्याने 7 डावांमध्ये 110 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 55 च्या सरासरीने 224.49 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी नको
असं होऊ शकते की चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्यांना येथून त्यांचे 90 टक्के सामने जिंकणे बंधनकारक असणार आहेत. उत्तम फटकेबाजी करु शकणारा आणि लय गवसलेला एक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याने वरच्या क्रमाकांवर फलंदाजी करायला हवी. त्याने मागील अनेक डावांमध्ये केलेल्या गोष्टीच तो पुन्हा पुन्हा करत राहणे फारच उपयोगाचे नाही, असेही पठाण म्हणाला.
कोणीतरी त्याला सांगितलं पाहिजे की…
त्याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यामध्ये परिणामकारक खेळी मोजक्या बॉलमध्ये केली हे मान्य. मात्र, जेव्हा संघाला गरज असते तेव्हा त्याच्या आधी शार्दुल ठाकूरला फलंदाजीला नाही पाठवू शकत. धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहणे खटकते. समीर रिझवी हा 15 व्या ओव्हरला पॅड घालून तयार होता. त्यांनी यावर काम केले पाहिजे. कोणीतरी धोनीला सांगितले पाहिजे की, ‘चल मित्रा किमान 4 ओव्हर तरी फलंदाजी कर, असंही पठाण म्हणाला.