लखनऊ 6 मे
रायबरेली आणि अमेठी मतदार संघ हे काँग्रेसचे परंपरागत मतदार संघ आहेत. या मतदार संघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसने अमेठीतून यावेळी गांधी घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी न देता किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर टाकण्यात आली आहे. आजपासून प्रियंका गांधी या अमेठी लोकसभा मतदार संघातील प्रचाराची धुरा संभाळत आहेत. प्रियांका गांधी-वाड्रा या अमेठीत रोड शो देखील करणार आहेत.
काँग्रेसने किशोरीलाल शर्मा या अमेठी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघ काँग्रेसचे परंपरागत मतदार संघ आहेत. मात्र काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत बिगर गांधी घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली आहे. किशोरीलाल शर्मा हे गांधी घराण्याचे खास विश्वासू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातही अमेठी आणि रायबरेली मतदार संघात काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी काँग्रेसने प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर सोपवली आहे.
अमेठी आणि रायबरेलीतील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी
प्रियांका गांधी-वाड्रा यांनी किशोरीलाल शर्मा यांचा अर्ज सादर करताना आपण 6 मेपासून निवडणूक संपेपर्यंत अमेठी आणि रायबरेली येथे उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रियांका गांधी-वाड्रा या आजपासून अमेठी आणि रायबरेली येथे तळ ठोकून असणार आहेत. त्यांची लोकसभा मतदार संघातील उपस्थिती कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दोन वॉररुमची स्थापना
अमेठीतील काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्या प्रचारासाठी वॉररूम तयार करण्यात आली आहेत. तर रायबरेली मतदार संघातही एक वॉररूम तयार करण्यात आले आहे. काँग्रेस नेते रवी शुक्ला यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा अमेठीतून निवडणूक लढवत नाहीत. मात्र, काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा हे 45 वर्षांपासून अमेठी आणि रायबरेलीमध्ये सेवक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची आपली जबाबदारी वाढते. गांधी परिवाराचे रायबरेली आणि अमेठीचे नाते कधीच संपू शकत नाही.