मुंबई 6 मे
प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. अलीकडील करणच्या पोस्टने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने रिॲलिटी शोमध्ये केल्या जाणाऱ्या मिमिक्रीवर नाराजी व्यक्त केली होती. करण जोहर, शाहरुख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची अनेकदा रिॲलिटी कॉमेडी करून नक्कल केली जाते. अनेकदा सेलेब्स त्याची मिमिक्री केल्यामुळे नाराज होताना दिसतात. आता करणने त्याच्या पोस्टवर लिहिले आहे की, मी आईबरोबर बसून टीव्ही पाहत होतो. एका तथाकथित वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या रिॲलिटी शोचा कॉमेडी प्रोमो मी पाहिला. त्या कॉमेडियनने माझी खूप वाईट मिमिक्री केली आहे. पुढे त्याने लिहिले, चेहरा आणि नाव लपवून काहीही बोलणाऱ्या ट्रोलर्सकडून मी हीच अपेक्षा करू शकतो. पण, 25 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीचा भाग असलेल्या व्यक्तीची जेव्हा चेष्टा करणारे काही लोक तुमच्याच इंडस्ट्रीचे असतात, तेव्हा वाईट वाटते. आता करणची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान चित्रपट निर्माती एकता कपूरनेही तिच्या इंस्टाग्रामवर करणची स्टोरी पोस्ट करत लिहिले आहे, असं अनेकवेळा घडले की, रिॲलिटी आणि अवॉर्ड शोमध्ये घाणेरडे विनोद करतात आणि यानंतर तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची अपेक्षा देखील करतात. करण, कृपया त्यांना तुमच्या क्लासिक चित्रपटांपैकी एक नक्कल करण्यास सांगा.
कॉमेडियनने माफी मागितली
दरम्यान, कॉमेडियन केतन सिंग हा कॉमेडी शो ‘मैडनेस मचाएंगे, इंडिया को हंसाएंगे’ मध्ये करण जोहरची नक्कल करताना दिसला. दरम्यान, केतन सिंगने एका मुलाखतीत या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. केतन सिंगने करण जोहरची माफी मागितली आहे. त्याने या मुलाखती दरम्यान म्हटले की, मला करण सरांची माफी मागायची आहे, मी त्यांचा शेवटचा रिलीज झालेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट 5 ते 6 वेळा पाहिला आहे. मी त्यांच्या कामाचा खूप मोठा चाहता आहे, जर मी त्यांना असे करून दुखावले असेल तर माफी मागतो. पण, माझा हेतू त्यांना दुखावण्याचा नव्हता. मी फक्त प्रेक्षकांना हसवत होतो, मी काहीतरी अतिरिक्त केले नाही. या कॉमेडी शोच्या निर्मात्यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.