कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा
गेल्या चार दिवसातील नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे सहयोगी सदस्य आणि इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे स्वतः हातकणंगले लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांनी तशी घोषणा शुक्रवारी सूर्य मध्यावर आल्यावर कोल्हापुरातील प्रेस क्लब कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. आमदार आवाडे जिल्हा ताराराणी पक्ष किंवा अपक्ष लढू शकतात. आमदार आवडे यांच्या या घोषणेमुळे डॉ. राहुल आवाडे यांना तलवार म्यान करावी लागणार आहे.
महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी डॉ. राहुल आवाडे गेले महिनाभरापासून प्रयत्न करीत होते. मात्र धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीकडूनही प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त होते. बुधवारी रात्री सावकार विनय कोरे यांनी आमदार आवाडे यांची भेट घेतली. त्यानंतर मध्यरात्री आमदार आवाडे यांनी राजेंद्र पाटील यांच्याशी त्यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन तासभर चर्चा केली आणि त्यानंतर लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट होईल असे संकेत डॉ. राहुल आवाडे यांनी दिले होते. शुक्रवारी सकाळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार आवाडे यांनी केली. आता पहावे लागेल आवाडे यांना उभे राहण्यासाठी कुणाची राजकीय खेळी आहे. आणि यात कुणाचा घात होणार आहे.