Spread the love


उष्माघात ही एक अशी वैद्यकीय गंभीर समस्या आहे ज्यामध्ये शरीराचे तापमान 40° सेल्सीअस किंवा त्याहून अधिक वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण वातावरणामुळे शरीर स्वतःचे तापमान सामान्य पातळीवर नियंत्रित ठेवू शकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या घामामुळे शरीराचे वाढलेले तापमान काही अंशी थंड होण्यास मदत होते मात्र उष्मघातामध्ये अस होत नाही. बराच वेळ उन्हात उभे राहिले किंवा उन्हामध्ये काम करत असल्यास अशी परिस्थिती उदभवते.याचा जास्त प्रभाव लहानमुले, वयोवृद्ध, मद्यपी तसेच लठ्ठव्यक्तींवर जाणवतो. जी व्यक्ती सतत उन्हामध्ये काम करत असते त्यांना उष्मघात होण्याची दाट शक्यता असते. वेळीच उष्मघाताच्या लक्षणांवर उपचार नाही केले तर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा प्रभाव पडून प्रसंगी मृत्यू होऊ शकतो.
उष्मघाताची लक्षणें
उष्माघाताने प्रभावित असलेल्या रुग्णामध्ये प्रामुख्याने पुढील लक्षणें आढळून येतात. त्वचा लाल गरम व कोरडी होने, थकवा येणे , डोकेदुखी , चक्कर येणे, मळमळ – उलटी येणे, ह्रदयाची गती वाढणे , चिडचडेपणा वाढणे तसेच काही रुग्णांच्यात श्वास घ्यायला त्रास होने अशी लक्षणें दिसतात.
उष्मघातावर उपाययोजना
दवाखान्यात दाखल करेपर्यंत प्रथमोपचार म्हणून सर्वात पहिले उष्माघाताने बाधित व्यक्तीला सावलीमध्ये किंवा थंड जागेत आणावे. फॅन चालू करावा किंवा जास्तीत जास्त हवा व्यक्तीच्या शरीरावर जाईल अशा पद्धतीने हवा घालावी. टॉवेल स्वच्छ पाण्याने ओला करून अंग पुसून घ्यावे. लिंबू सरबत अथवा पाणी भरपूर पिण्यास द्यावे जिणेकरून शरीरातील जलाचे प्रमाणं नियंत्रित करून डीहायड्रेशन पासून रोखता येईल. हलके मऊ व सूती कपडे घालावेत.
त्यानंतर सदर उष्माघात बाधित व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करावे.
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेच्या तीव्र लाटांपासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. उन्हामध्ये जात असताना डोक्यावर टोपी रुमाल अथवा छत्रीचा वापर करावा जेणेकरून उष्माघातापासून बचावं करू शकतो.
आपलाच,
डॉ अतुल शिवाजी पाटील ( बालरोगतज्ञ )
मातोश्री चाईल्ड क्लिनिक शिरोळ जि कोल्हापूर
मोबा – 8180914599