Spread the love


मुंबई,17 एप्रिल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत धडकली आहे. या यात्रेचा आज शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार असून इंडिया आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीची पहिलीच सभा मुंबईत होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ इंडिया आघाडीकडून मुंबईत वाढवण्यात येणार आहे. राहुल गांधींच्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
शिवसैनिकांसाठी हा काळा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा होत आहे. त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. ज्या राहुल गांधींनी स्वातंर्त्यवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
बावनकुळेंची व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझे दुकान बंद करेन, अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ बावनकुळेंकडून ट्विट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.