Spread the love

डॉ अतुल पाटील (बालरोगतज्ञ)
मातोश्री चाईल्ड क्लिनिक शिरोळ कोल्हापूर
मोबा – 8180914599

या आठवड्यात शिरोळ व आसपासच्या गावांमध्ये गॅस्ट्रोसदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. या आजाराला मराठी भाषेत संसर्गजन्य अतिसार असे म्हणतात. या आजारामध्ये जिवाणू ; विषाणू ; परजीवी तसेच बुरशी इत्यादीमुळे जंतुसंसर्ग होऊन पोट व आतड्यांमध्ये सुज येते व दाह निर्माण होतो. या आजारामध्ये प्रामुख्याने उलटी ; जुलाब व पोटदुखी ही लक्षणे दिसून येतात. त्याबरोबरच ताप ; उलटी जुलाबामुळे शरीरामधील द्रवाचे प्रमाण कमी होऊन ऊर्जेचा अभाव तसेच अशक्तपणा जाणवू लागतो. लहान मुलांच्यामध्ये रोटाव्हायरस या प्रमुख विषाणूमुळे गॅस्ट्रोची लागण होते. प्रौढांमध्ये ई कोलाई, नोरोव्हायरस आणि कॅम्पिलोबॅक्टर या जंतुमुळे मुख्यत्वे गॅस्ट्रोची लागण होते. अयोग्यरित्या तयार केलेले अन्न खाणे, दूषित पाणी पिणे किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी जवळचा संपर्क यामुळे हा रोग पसरू शकतो . पिण्यासाठी उकळून थंड केलेल्या अथवा स्वच्छ पाण्याचा वापर करणे, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुणे, आपल्या सभोवतालच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, लहान मुलांना फॉर्मुला दूध वापरण्याऐवजी स्तनपानाबाबत जागरूकता करणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. तसेच लहान मुलांना रोटाव्हायरस लस देऊन आजार टाळता येऊ शकतो. आजारांच्या सौम्य लक्षणांमध्ये ओरल रीहायड्रेशन सोल्युशन ( क्षार ; पाणी व साखर यांचे मिश्रण) देऊन शरीरातील झालेले द्रवाचे प्रमाणं व ऊर्जा भरून काढता येते. अधिक गंभीर रुग्णामध्ये प्रतिजैविकांचा तसेच आंतस्नायू द्रवपदार्थ ( सलाईन) यांचा वापर करून रुग्णांना बरे केले जाते. लहान मुलांमध्ये झिंक सल्फेट चा वापर केला जातो. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे तसेच स्वच्छतेच्या सवयी लवकर आत्मसात होत नसल्याने संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
आजाराची गंभीर लक्षणें असलेल्या रुग्णांमध्ये शी च्या नमुन्याची तपासणी करून कोणत्या जंतुमुळे संसर्ग झाला आहे याचे निदान केले जाते व त्याअनुरूप डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार केले जातात. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या प्रमाणे लक्षणें आढळल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरकडून तपासनी करावी व औषधोपचार घ्यावेत.