मुंबई,17 मार्च
माढ्यात भाजप नेत्यांमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांनीही आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकाकडूनही प्रचंड संताप व्यक्त केला. मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आज अकलूजमध्ये आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची गाडी आढवली. त्यावेळी घोषणाबाजीही केली. महाजन यांचा रस्ता कार्यकर्त्यांनी आडवला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी अजून आपल्याकडे बराच वेळ असल्याचं सांगितलं.
मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. बंद दाराआड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले. गिरीश महाजन बाहेर येताच खूप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना पुन्हा घरात नेले. पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही. जवळपास दोन तास राडा सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली. मोहिते पाटील यांची नाराजी , राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे. वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
संतप्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाजन काय म्हणाले ?
मोहिते पाटील यांची नाराजी आणि कार्यकर्त्यांचा संताप पाहून काल (शनिवारी) देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. माढ्यातून निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे दादांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांना भेटावं लागेल. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्यांना न विचारता आपण निर्णय घेतला, पण आपल्याला ते महागात पडेल, असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. त्यानंतर आमच्यामध्ये चर्चा झाली, आज मी विजयसिंह मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी आलो आहे. त्यांची नाराजी मी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहचवेल, असे महाजन म्हणाले.
विजयदादा यांच्यासोबत दीड तास चर्चा झाली. तुमच्या मनातील राग, संताप आणि नाराजी याबाबत आमची चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा करणार आहे. पण येथील सर्व काही मी वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे. आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे. सर्व काही वरिष्ठांना सांगणार आहे. त्यानंतर ते निर्णय घेतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना महाजन यांनी दिला.
मोहिते पाटील यांचे मत जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. त्यांना डावलले जाणार नाही, त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे. त्यांच्यावर नक्कीच तोडगा काढूयात, सर्व अडचणींची मी लिहूनही घेतले आहे. त्यावर नक्कीच तोडगा काढूयात. मोहिते पाटील यांचे म्हणणे मी देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडेन, आपल्याला अजून वेळ आहे. वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील. आपल्याला संयम ठेवावाच लागेल. तुमचा राग मी जाणून घेतला आहे, पण संयम ठेवावा, असे गिरिश महाजन म्हणाले.