Spread the love


मुंबई,17 मार्च
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी मुंबईत समारोप झाला. ’इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कमधून निवडणूक प्रचाराची सुरुवात केलीय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते उपस्थित होते. या सभेतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
दिग्गज नेत्यांची हजेरी : महासभेसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला, आप नेते सौरभ भारद्वाज, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह 15 इंडिया आघाडीचे 40 हून अधिक प्रमुख नेते सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत झाली.
’अब की बार भाजपा तडीपार’ : ’’भाजपा देशात नुसता फुगा आहे. या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केले होते. ती हवा आता त्यांच्या डोक्यात गेलीय. आम्ही हुकूमशाहीविरोधात आहोत. मोदी तुमच्या परिवारात फक्त तुमची खूर्ची आणि सत्ता एवढंच आहे,’’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केलीय. ’’न्यायालयात शपथ घेताना धर्माच्या ग्रंथावर शपथ न घेता घटनेवर घ्यायला हवी,’’ असे देखील ठाकरे म्हणाले. देश आपलाच धर्म आहे. देश वाचला तर आपण वाचू, कोणी कितीही मोठा असला तरी, देश मोठा असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. देशात एक मजूबत सरकार असायला हवे होते, असे वाटत होते. मात्र, 2014 पासून देशात एकाच पक्षाचे सरकार आहे. देशात जेव्हा जनता एकवटते तेव्हा, हुकूमशाहच्या छाताडावर बसून रणशिंग फुकायचे. देशाची जनता माझ्या सोबत आहे. तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ’अब की बार भाजपा तडीपार’, अशी टीका ठाकरेंनी मोदी सरकारवर केलीय.
देशात परिस्थिती बदलण्याची गरज : ’’देशात परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मोदींची चुकीची गॅरंटी आहे. तसंच आपल्याला दबाब तंत्राविरोधात लढावे लागणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर मोदींवर कडाडले : देशात मी 2004 पासून ईव्हीएम मशीन विरोधात लढत आहे. त्यामुळे उमेदवाराने मागणी केल्यास मतगणना करताना पेपरचीही मतगणना करावी. आपण सोबत असू किंवा नसू या यंत्रणेविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला लगावलाय. तसंच त्यांनी निवडणूक रोख्यांवरून भाजपा सरकारवर निशाना साधलाय.
तेजस्वी यादव यांचा मोदींवर हल्लाबोल : सभेला संबोधित करताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी रोजगार, महागाईवरून मोदी सरकारवर निशाना साधलाय. देशात आम्ही मोदींना घाबरत नाही, बिहारसह महाराष्ट्रात डिलरनं सरकार पाडलं, अशी टीका त्यांनी भाजपा सरकारवर केलीय.
काय म्हणाले सौरभ भारद्वाज? : आम आदमी पार्टीचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही यावेळी सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम तसंच इलेक्टोरल बाँड्सवरून भाजपावर टीका केलीय. प्रत्येकानं सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह करून इलेक्टोरल बाँड्सची माहिती द्यावी, अशी मागणीही सौरभ भारद्वाज यांनी केलीय.
एम.के स्टॅलिन तसंच फारुख अब्दुल्ला यांच्या भाषणाने सभेला सुरुवात : ’इंडिया’ आघाडीच्या सभेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन तसंच जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या भाषणांनी सुरुवात झाली. देशात पुढील निवडणुकीत इंडिया आघाडीचं सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच यावेळी फारुक अब्दुल्ला यांनी देशात सत्ता आल्यास ईवीएम मशीन हटवण्यात यईल तसंच ईव्हीएम मशीन चोर असल्याचे ते म्हणाले.