Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरहून शिरोलीच्या दिशेने येणाऱ्या मोटर सायकल स्वारास भरधाव टाटा डंपरणे पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटर सायकल स्वार डांबरी रस्त्यावर आपटला आणि त्याच्या अंगावरून हा डंपर गेल्याने त्याच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजता शिरोली जवळील हॉटेल शबनम समोर घडला. यामध्ये चिकोडी तालुक्यातील जनवाड इथल्या संतोष मलगोंडा पाटील यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिकोडी तालुक्यातील जनवाड इथले संतोष मलगोंडा पाटील हे कामानिमित्त मोटरसायकल क्रमांक केए 23 इ एल 7959 वरून कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. काम आटोपून ते शिरोली कडे निघाले होते. सकाळी साडेदहाच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली गावच्या हद्दीतील हॉटेल शबनम समोर आले असता तावडे हॉटेलहुन शिरोलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टाटा डंपर क्रमांक mh 09 एल 5079 ने पाठीमागून मोटर सायकल ला जोराची धडक दिली. यामध्ये मोटरसायकलस्वार संतोष पाटील हे उडून रस्त्यावर आपटले यावेळी हा डंपर त्याच्या अंगावरून गेल्याने त्याच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल नंदिनी मोहिते, आणि शुभांगी पाखरे यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सी पी आर ला पाठवण्यात आला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.