कोल्हापूर, दि. 1 : जिल्ह्यातील अनेक दुध संकलन केंद्रावर दुध खरेदी / विक्री करताना सुलभता यावी यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर केला जातो. दुध मापनामध्ये अधिक अचुकता येण्यासाठी नियंत्रक वैधमापन शास्त्र, मुंबई यांनी ज्या दुध संकलन केंद्रावर दुध मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर केला जातो. त्या सर्व दुध संकलन केंद्रात 10 ग्रॅम अचुकतेचे तोलन उपकरणांचा वापर करणे बांधनकारक असल्याचे निर्गमित केले असल्याचे वैध मापन शास्त्राचे उप नियंत्रक द. प्र. पवार यांनी कळविले आहे.
1 जानेवारी 2023 पासून सुधारित आदेशाची अंमलबजावणी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण वापरणाऱ्या सर्व दुध संस्थांना करणे बंधनकारक केलेले आहे. 1 जानेवारी 2023 पासून हा सुधारित आदेश लागू झालेला असताना देखील काही दुध संकलन केंद्रावर 100 ग्रॅम अचूकतेचे तोलन उपकरणे वापरात असल्याच्या तक्रारी या वैध मापन शास्त्र कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. तपासणी मोहिम राबविली असता 70 दुध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे. आदेशानुसार 10 ग्रॅम अचूकतेची तोलन उपकरणे न वापरणे, वजन मापे व तोलन उपकरणांची विहित मुदतीत फेरपडताळणी न करता वापर करणे, वजन काट्यांमध्ये अनाधिकृतपणे फेरफार करणे व जास्त दुध घेऊन शेतकऱ्यांना कमी मोबदला देणे अशा बेकायदेशीर बाबी आढळून आल्याने गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. दुध संकलन केंद्राची तपासणी मोहिम या पुढे सुध्दा सुरु ठेवण्यात येणार असून कायद्याचे पालन न करण्याऱ्या दुध संस्थावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे ज्या दुध संकलन केंद्रानी 10 ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक काटयाचा वापर अदयापर्यंत सुरू केलेला नसेल त्यांनी त्वरीत 10 ग्रॅम अचुकतेचे वजन काटे वापरावेत.
नवीन वजन काटे विकत घेताना विक्रेत्याकडून मुळ बिल व मुळ पडताळणी प्रमाणपत्र घेण्यात यावे. खरेदी अधिकृत परवानाधारक विकेत्यांकडून करावी त्याचप्रमाणे काटयाना वैध सील असल्याची व काटा अखंड तारेने सील केलेली असल्याची खात्री करावी. सील तुटले असल्यास असे काटे स्वीकारु नयेत. काटे दुरुस्ती वैध परवानाधारक दुरुस्तकांकडून करुन घ्यावीत दुरुस्ती नंतर काटा पुन्हा पडताळणी करुनच वापरावा पुन्हा पडताळणी न करता वापरल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. फसवणूकीच्या दृष्टीने काटयामध्ये अनाधिकृतपणे फेरफार करणे व सील तोडणे या करिता कायदयात शिक्षेच्या तरतूदी आहेत. त्यामुळे सर्व उपयोगकर्त्यानी अशा बेकायदेशीर कृत्ये करु नयेत अन्यथा कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागले यांची नोंद घ्यावी. वैधमापनशास्त्र कायदयातील गुन्हयांमध्ये सर्व संचालकांना सुध्दा जबाबदार धरले जाते याची सुध्दा नोंद घ्यावी.