सुळकूड पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री यांचेकडे ११ सप्टेंबर रोजी बैठक
सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्त सेवा
इचलकरंजी दि. २१ – “इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरीत सुरु झालीच पाहिजे. या मागणीसाठी बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी इचलकरंजी बंद व प्रांत कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला विराट मोर्चा तहकूब करण्यात आलेला आहे. मा. मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री यांनी बैठक आयोजित करावी यासाठी मा. खा. धैर्यशील माने, माजी. आ. प्रकाश आवाडे, रविंद्र माने, विठ्ठल चोपडे यांनी तातडीने केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे, कृति समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. या यशस्वी सुरुवातीचे संपूर्ण श्रेय इचलकरंजी शहरातील ४ लाख जनतेचे व त्यांनी गेल्या १६ दिवसांत निर्माण केलेल्या जनरेट्याचे व दबावाचे आहे. मानवी साखळी व विभागवार जनजागरण सभा यांना जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल कृति समिती सर्व इचलकरंजीकरांना धन्यवाद देत आहे” असे जाहीर प्रसिद्धी पत्रक कृति समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
राजीव गांधी भवन येथे दि. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीस खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे व माजी खा. राजू शेट्टी हे उपस्थित होते. जिल्ह्यातील वातावरण बिघडू नये अशी भूमिका त्यावेळी मांडण्यात आली होती. त्यावेळी मा. मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लागली, तर मोर्चाबद्दल फेरविचार करण्यात येईल असे कृति समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार मुंबई येथे मा मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावण्यात आली हे समजल्यानंतर तातडीने कृति समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये खासदार व आमदार यांच्या आवाहनानुसार बंद व मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आपली पाणी योजनेची अंमलबजावणी चळवळ एक टप्पा पुढे गेल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर “पुढील काळात गरज पडल्यास पुन्हा चळवळ वा आंदोलन करण्याची तयारी जनतेने ठेवावी” असेही आवाहन करण्यात आले आहे.
इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या वतीने समन्वय समितीची तातडीची बैठक महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालय, महासत्ता चौक, इचलकरंजी येथे संपन्न झाली. प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये शशांक बावचकर, मदन कारंडे, प्रकाश दत्तवाडे, अजीतमामा जाधव, सागर चाळके, नितीन जांभळे, प्रसाद कुलकर्णी, पुंडलिक जाधव, कॉ. सुनील बारवाडे, कॉ. सदा मलाबादे, शहाजी भोसले, भाऊसाहेब आवळे, सयाजी चव्हाण, अभिजित पटवा, विकास चौगुले, संगीता आलासे, रवि रजपुते, कौशिक मराठे, विजय जगताप, रवि जावळे, वसंत कोरवी, ध्रुवती दळवाई, सुषमा साळुंखे, रिटा रॉड्रिग्युस, प्रताप पाटील, जाविद मोमीन व अन्य मान्यवर उपस्थित होते.