शिरोळमधील हाजी बाळासो काशिम शेख यांचे कुटुंब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मराठा समाजातील आंदोलकांना शेख कुटुंबियांनी दोन ट्रक भडंग दिले होते.
हाजी बाळासो शेख यांचे निवासस्थान मिरज-शिरोळ महामार्गाच्या शेजारी आहे. या मार्गावर अनेक पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होत असतात. यावेळी शेख कुटुंबिय फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. गेल्या 17 वर्षाहून अधिक काळापासून हा उपक्रम त्यांचा सुरू आहे. वर्षभरात 16 पायी दिंडीच्या भोजनाची व्यवस्था होत असते. आज शनिवारी शिरदवाड येथील दिंडीचे स्वागत नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील व जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर आरती करून भोजनाला सुरूवात करण्यात आली. सर्व वारकरी विठ्ठलाच्या नामामध्ये तल्लीन झाले होते.