हॉटेलच्या नावाखाली दारू विक्रीला मुभा देण्याचा प्रयत्न केल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा
कुरुंदवाड : प्रतिनिधी
शिरढोण ( ता शिरोळ ) येथे दारुबंदीसाठी ग्रामस्थाबरोबरच महिला ग्रामसभेचा ठराव असताना देखील शिरढोण मध्ये प्रशासनाला हाताशी धरून हॉटेल परवानगीच्या नावाखाली परमिट रूम बियर बारचा घाट घातला जात आहे, शिरढोण
मधील महिला भगिनींचा विरोध डावलून जर आडवी बाटली उभी करण्याचा प्रयत्न केला तर प्रहार स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.दगडू माने यांनी दिला आहे.
ते म्हणले , शिरोळ तालुक्यातील शिरढोण गाव धार्मिक विचाराबरोबरच सामाजिक सलोखा जपणारे गाव आहे. अन्याय विरुद्ध बंड करणाऱ्या चळवळीच्या या गावात एकही परमिट रूम बिअर बार नाही, मात्र प्रशासनातील
ग्रामविकास अधिकारी व लिपिक यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली परमिट रूमसाठी ना हरकत दाखला दिला आहे. तसेच परमिट रूमचा घाट घातलेल्या संबंधितांनी देखील ग्रामपंचायत प्रशासनाबरोबर गावातील ग्रामस्थांना अंधारात ठेवून कागदपत्रांचे घोडे नाचवीत आहेत. दारूबंदी विभागाचे पत्र ग्रामपंचायतीला आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यासह गावातील महिलांनी हॉटेलच्या नावाखालील परमिट रूम बियर बार परवान्याला विरोध केला आहे. जर संपूर्ण गावचा विरोध असताना देखील गावात परमिट रूमचा घाट घातला जात असेल तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला जाईल.
दरम्यान, या संपूर्ण नियोजित गोड बंगाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या ग्रामसेवक, लिपिक तसेच संबंधीत दोषीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे डॉ.दगडू माने यांनी पत्रकारांना सांगितले.