मुंबई,6 जुलै
ईडीचा ससेमीरा टाळण्यासाठी अजित पवारांसोबत गेलेल्या कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचा स्थानिक राजकारणातून गुंता कमी होण्याऐवजी वाढण्याचीच जास्त चिन्हे दिसू लागली आहेत. मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. त्यांनआज कागलमध्ये मेळावा घेत भाजपसोबत राहणार असल्याचा निर्धार करत मुश्रीफांविरोधात पुन्हा दंड थोपटले आहेत. त्यामुळे कागलच्या पुन्हा गटातटाच्या राजकारणात राजकीय संघर्ष अटळ असल्याची चिन्हे आहेत.
माझे राजकीय गुरू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत, पक्षाच्या निर्णयासाठी माणूस मुख्यमंत्री असलेला उपमुख्यमंत्री झाला. हेळसांड, कुचंबणा झाली म्हणून मी गुरू बदलणारा नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भाजपमध्येच राहणार, अशी ग्वाही घाटगे यांनी आज मेळाव्यातून दिली. कागलमध्ये ज्या घडामोडी झाल्या, कोण उपमुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नसल्याचे ते म्हणाले.
थोड्याच दिवसात पत्रकार परिषद घेणार
मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे.मुश्रीफांवर गेल्या सहा महिन्यांमध्ये तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. जिल्हा बँकेवरही छापेमारी झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर आरोप केले आहेत. त्यांनी कारखाना कार्यस्थळाला भेट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय राडा झाला होता. सोमय्या कोल्हापुरात आल्यानंतर मुश्रीफांनी तोफ डागल्यानंतर घाटगे यांनी एकवेळ किरीट सोमय्या परवडेल, पण मी परवडणार नाही असे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना आज विचारण्यात आले असता मुश्रीफांवरील आरोपांबाबत थोड्याच दिवसात पत्रकार परिषद घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळूनही मुश्रीफ आणि घाटगे गटातील राजकीय संघर्ष वाढणारच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुश्रीफ ईडीच्या रडारवर
ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. त्यांच्या तिन्ही मुलांमागेही ईडीचा ससेमीरा सुरु आहे. तसेच कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात 108 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे, ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुश्रीफांना हायकोर्टाने ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात 11 जुलैपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश दिले आहेत. शरद पवार यांनीही अजित पवार गटातील ईडीच्या रडारवर असलेल्या नेत्यांची यादी वाचताना दोन नंबरला हसन मुश्रीफ यांचा उल्लेख केला होता.