कोल्हापूर,6 जुलै
आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज नाराजीनाट्यावर पडदा टाकताना भाजपसोबत असल्याची टीका केली. मला घालवण्याची घाई कशासाठी? असे सांगत समरजितसिंह घाटगे यांनी भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. माझे राजकीय गुरू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत, पक्षाच्या निर्णयासाठी माणूस मुख्यमंत्री असलेला उपमुख्यमंत्री झाला. हेळसांड, कुचंबणा झाली म्हणून मी गुरू बदलणारा नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भाजपमध्येच राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. कागलमध्ये ज्या घडामोडी झाल्या, कोण उपमुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नसल्याचे ते म्हणाले.
पक्षनिष्ठा काय असते मी कागलमधून दाखवून देईन : समरजित घाटगे
भाजप रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सोडणार नसल्याचे सांगत घाटगे यांनी मुश्रीफांच्या मंत्रिपदानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षनिष्ठा काय असते मी कागलमधून दाखवून देईन, असेही ते म्हणाले. अजित पवार यांनी आम्हाला पुरोगामीचं प्रमाणपत्र दिलं. संपूर्ण राज्याचं लक्ष कागलच्या परिवर्तनासाठी लागलं आहे. आज आपल्या विजयाचे भुमीपूजन झालं आहे. आमदारकी लढणार आणि मोठ्या मार्जिननं काढणार आहे. जे झालं आहे ते करेक्ट झालं आहे, 2024 साली डबल मार्जिननं जिंकणार आहे, कागलचा कोंढाणा परत घ्यायचा असे म्हण त्यांनी रणशिंग फुंकले.
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मेसेज करून भेटण्यासाठी बोलवलं : समरजित घाटगे
समरजित म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहून म्हटलं मी पुन्हा येईन. या सगळ्यानंतर मला अनेक फोन आले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मेसेज करून भेटण्यासाठी बोलवलं. माझं पुनर्वसन करण्यासाठी किंवा काही मागण्यासाठी गेलो नव्हतो. जो कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला, सपोर्ट दिला त्याबद्दल मी आयुष्यभर ॠणी राहीन. या दोन दिवसात राज्यातील सगळ्या पक्षांचे फोन आले, पण बुद्रुकसाठी मी पार्टी का सोडायची?
मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने समरजित काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी भाजपसोबत राहणार असल्याचे जाहीर करताना मुश्रीफांशी सुद्धा दोन हात करण्याची भूमिका जाहीर केली आहे. घाटगे यांनी सांगितले की, काही तासांच्या निरोपावर हजारो संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. मी काय निर्णय घेणार हे माहिती नसताना देखील मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित राहिले.