Spread the love

मुंबई,6 जुलै

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची साथ दिल्यामुळे महाविकास आघाडीकडून ज्या प्रकारे भाजपला हरवणार, असं वारंवार सांगण्यात येत होतं ते आता तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे आता उबाठा आणि सुळे गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होऊन निवडणुका जिंकण्यासाठी प्रस्ताव करत आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी आपली परखड भूमिका मांडली.

उबाठा आणि सुळे गटाने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा प्रस्ताव केल्याची माहिती आमच्याकडे आहे. याबद्दल मातोश्रीवर देखील चर्चा झाली. जेणेकरुन हे दोन्ही गट काँग्रेसमध्ये विलीन करुन एकाच पक्षाच्या नावाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवण्याची चर्चा सुरु आहे, अशी आमची माहिती आहे. पाटन्यामध्ये जी बैठक झाली, अशा काही गोष्टींच्या माध्यमातून संजय राऊत महाराष्ट्रासमोर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं चित्र निर्माण करत आहे. मात्र काल अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या भाषणांनी राऊतांचा बुरखा फाडण्याचं काम केलं.

त्यांनी तिथे स्पष्ट सांगितलं की, स्वत: शरद पवारसाहेब वारंवार त्यांना सांगत होते की, नरेंद्र मोदींशिवाय भारताला नेतृत्व नाही. मग कुठल्या विचारांनी विरोधकांच्या बैठका व्हायच्या? ज्यांनी महाविकास आघाडी उभी केली तेच जर अप्रत्यक्षपणे मोदीजींना मानत असतील, तर दुसऱ्यांना काय किंमत आहे? असा टोला नितेश राणेंनी राऊतांना लगावला.

प्रफुल्ल पटेलांनी सत्य समोर आणले

संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे लोक असं भासवत होते की पाटन्यामध्ये भाजपविरोधात मोठा प्लॅन झाला आहे,भाजप आणि मित्रपक्षांना आता हरवणार. मात्र हा आव आणणाऱ्यांचे वस्त्रहरण करण्याचं काम प्रफुल्ल पटेलजींनी केले, असे नितेश राणे म्हणाले.

अजितदादांना बाहेर ढकलण्याची सुपारी संजय राऊतचीच

संजय राऊत अजितदादांना अक्कल शिकवायला जात होते. अजितदादांना बाहेर ढकलण्याची सुपारी संजय राऊतनेच घेतली होती, कारण त्याच पद्धतीने त्यांचे स्टेटमेंटस येत होते. मात्र अजितदादा बाहेर गेले नाहीत, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व म्हणून प्रस्थापित झाले आहेत आणि राष्ट्रवादीला त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जाणार आहेत. मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली 2024 ची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून लढणार आहेत, असं नितेश राणे म्हणाले.

संजय राऊतांनी फ्रान्सवर बोलावे

पाकिस्तान आणि भारताची तुलना करण्यापेक्षा बांग्लादेशी आणि रोहिंगे मुसलमानांच्या वाढत्या संख्येमुळे फ्रान्स आणि युरोपला जो त्रास होत आहे, त्यावर संजय राऊतांनी अग्रलेख लिहावा. हाच त्रास मुंबईतदेखील होऊ शकतो, असंही नितेश राणे म्हणाले. या मुसलमानांना आधारकार्ड, पाणी, वीज हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महापालिकेने दिलं आहे. त्यांचा मुंबईतील कर्ता धर्ता उद्धव ठाकरेच आहे, असा थेट आरोप नितेश राणे यांनी केला.

विनायक राऊतांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे

शिवसेनेच्या काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला मात्र नितेश राणेंनी हा दावा मोडून काढला. काल वर्षा बंगल्यावर उपस्थित असणार्‌‍?या सर्व आमदारांनी एकमताने आम्ही शिंदेसाहेबांसोबतच आहोत, त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे विनायक राऊतांनी काड्या लावण्यापेक्षा आपल्या रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या मतदारसंघात थोडं लक्ष द्यावं, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली.