मुंबई,2 जून
आज राजभवनमध्ये शपथविधीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यात राजकारणात एक मोठी घडामोड आज होणार असून राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते अजितदादांचे आनंदाने स्वागत माध्यमांना सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र यावर आता काही बोलणे टाळले आहे, सर्व काही पार पडल्यानंतरच बोलू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली अजित पवार आणि 40 आमदार देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणाकरता एकत्र येत असतील तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटी हा देश कोण चालवू शकते, या देशाचे कल्याण कोण करु शकते यासाठी जो संकल्प मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व नेते इथे आले आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो, असे बावनकुळे म्हणाले. मात्र अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का यावर ते आपल्याला पुढे कळेल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपचे प्रविण दरेकर म्हणाले, पंप्रधान मोदींच्या नेतृत्वावर पक्षापलीकडे जाऊन लोकांचा विश्वास बसत आहे. महाराष्ट्राला गतिमान करायचं असेल तर भाजप आणि मोदीजींशिवाय पर्याय नाही, हे महाराष्ट्रातील नेत्यांनादेखील कळले आहे. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करु शकते, हा विश्वास वृद्धिंगत होताना दिसत आहे, अशी सूचक प्रतिक्रिया प्रविण दरेकरांनी दिली.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, राज्याचे सरकार मजबूत होण्याचा हा अतिशय आनंदाचा प्रसंग आहे आणि याचे संपूर्ण महाराष्ट्र स्वागत करेल.