कोल्हापूर,8 जून
आपल्याला काय स्टेटसला लावायचे याबाबत काळजी घ्यायला हवी. आपल्यासह सर्वजण या व्हिडिओनंतर नाराज आहेत. औरंगाबाद, नाशिक, आता कोल्हापूर यांचा अभ्यास करून या घटनांची लिंक आहेत की, या सर्व वेगवेगळ्या आहेत, या दृष्टीकोनातून याकडे पाहिले पाहिजे असा सूचक सल्ला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा : सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा आहे. आपण आता नवीन युगात 21 व्या शतकात राहत आहोत. अशा वेळेस आपल्या पूर्वजांचा विचार आणि त्यांच्या शिकवणी आपल्या डोळ्यासमोर असणे गरजेचे आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. त्यामुळे याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे. कारण, शोधण्यासाठी या प्रकरणाकडे मानसिकदृष्ट्या पाहिले पाहिजे. सर्वांनी सलोख्याने राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सर्वांत पहिली कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही शासनाची आणि गृहखात्याची असते. त्यांनी या संबंधित सर्व रिपोर्ट घेतले पाहिजे. अशा घटना परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, अशाही सूचना शाहू महाराजांनी दिल्या.
तपास यंत्रणा सक्रिय हवी : पोलिसांनी आता यापुढे अधिक सतर्क राहिले पाहिजे. तसेच त्यांची तपास यंत्रणा अधिक सक्रिय व्हायला हवी. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालले पाहिजे आणि कायदेशीर शिक्षा व्हायला हवी, असे मतही त्यांनी मांडले. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश म्हणावे लागेल का, यावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी एकाच व्यक्तीला या प्रकरणावर जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे सांगितले. प्रशासनाला वेळ देणे गरजेचे आहे. यामागे काही लिंक आहे का, याकडे पाहायला पाहिजे. तसेच अशा दंगलीमुळे लोकांचे हाल होत असतात, याचे भान असले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी दोघांनी मर्यादा ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
तर आपण स्वत: रस्त्यावर उतरू: छत्रपती शाहु महाराजांच्या या सर्वधर्म समभाव असलेल्या करवीर नगरीत काल (बुधवारी) तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली. यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना आपण स्वत: फोन केला. काही गरज वाटली तर आपण स्वत: रस्त्यावर उतरून लोकांना शांत राहण्यास सांगायला तयार असल्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले होते; पण त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसावी. त्यामुळे त्यांनी आपल्याला काही कल्पना दिली नसावी, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.