’ज्याच्या कुंडलीत योग..’
कोल्हापूर,5 जून
कोल्हापूर लोकसभेच्या दोन जागा कोणाकडे असणार याबाबत भाजप आणि शिवसेनेत अद्यापही निर्णय नाही. मात्र, ज्याच्या कुंडलीत योग आहे त्यालाच उमेदवारी मिळेल, असे म्हणत केंद्रीय मंत्री ज्योदिरादित्य सिंधिया यांनी गुगली टाकली. मात्र, या दोन्ही जागेवर सध्या शिंदे सेनेचे खासदार असल्याने आणि भाजपची इथे तयारी वाढल्याने शिंदे सेनेत धुसपुस आहे.
कोल्हापूरच्या लोकसभेच्या दोन्ही जागेवर कमळ फुलवायच्या इराद्याने भाजपने कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना केंद्रीय नेतृत्वाने यासाठी मैदानात उतरवले आहे. सिंधियांच्या मालकीचे असलेले जोतिबा देवस्थान आणि राजघराण्यातील व्यक्ती म्हणून त्याना मानणारा वर्ग या भागात असल्याने सिंधियांनीही आपल्या दौèयातून भाजपला बळकटी दिली आहे. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्याच्या नावाखाली असलेले हे दौरे शिंदे सेनेची मात्र डोकेदुखी वाढवणारे ठरले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदार संघात अनुक्रमे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे शिंदे सेनेचे खासदार आहेत. मात्र, त्यांच्या संपर्क दौèयापेक्षा सिंधियांचे संपर्क दौरे आणि कार्यक्रम अधिक होऊ लागले आहेत. सिंधियांनी पक्ष वाढीसाठी हे दौरे असून उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नसल्याचे स्पष्ट केलेय. मात्र, ज्याच्या कुंडलीत लिहले आहे त्यालाच उमेदवारी दिली जाईल म्हणत गुगलीही टाकली आहे.
शिंदे सेनेनेही याबाबत सावध पावले टाकली आहेत. भाजपसोबत राज्यात आघाडी असल्याने त्यांना न दुखवता मार्गक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे भाजपचे दौरे वाढले असले तरी ते सहन करण्यापलीकडे शिंदे सेनेच्या हातात सध्या काही नाही. मात्र, लोकसभेला अद्याप अवधी असून नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे जो उमेदवार ठरवतील त्यांच्या पाठशी शिंदे यांचे शिवसैनिक उभे राहतील, असे शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलेय.
भाजपने 400 प्लस हे मिशन हाती घेऊन लोकसभेची तयारी सुरू केली आहे. कोल्हापुरात नेहमी भाजपला रोखले गेले आहे. त्यामुळे इथे कमळ फुलवून राज्यात आघाडी घ्यायची असा इरादा भाजपचा आहे. शिवाय कोल्हापूर आणि सांगली अशा दोन जिह्यात हातकणंगले हा मतदार संघ विभागला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात भाजप यामुळे वाढवायला सोपे जाणार आहे. त्यामुळे भाजपने ही रणनीती आखली आहे. मात्र, या रणनितीचा त्रास विरोधकांऐवजी शिंदे सेनेलाच अधिक आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना भविष्यात उमेदवारी मिळणार की भाकरी इथे परतली जाणार याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे या जागा आता कोणाला जाणार यावरच इथले गणित सुटणार आहे.