Spread the love

महिला आमदारांना स्थान मिळणार?


मुंबई 5 जून
शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री तातडीचा नवी दिल्ली दौरा करत अमित शाहांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या मंत्रिमंडळात मिशन 45 ला फायदेशीर ठरणाèया नेत्यांनाच स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापण दिन असून त्याआधी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार व्हावा असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडल्याची माहिती आहे.
पुढच्या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक समोर ठेवून या मंत्रीमंडळात नेत्यांची वर्णी लावली जाणार आहे. प्रभाव पाडू न शकणाèया आणि वादग्रस्त नेत्यांना बाजूला केले जाणार असल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे महिला आमदारांनाही स्थान मिळण्याचीही शक्यता आहे. पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराची मंत्रीमंडळात वर्णी लागली नव्हती.त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दोन खासदारांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.
सर्व निवडणुकू एकत्र लढवणार
आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. शिंदे फडणवीसांची बैठक अमित शाहांसोबत झाली. आगामी लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढवणार असल्याचा निर्णय शाहांसोबतच्या दिल्लीतील बैठकीत झाला. या बैठकीबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टिवट करून दिलीय.
संजय राऊत यांची टीका
दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीचं मांडलिकत्व पत्करलंय अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीत कशाला मुख्यमंत्री गेले असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेसचे सावध पाऊल
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी घाई नको असा सूर काँग्रेसमध्ये उमटतोय. जागावाटप लवकरात लवकर करण्याची मागणी राष्ट्रवादीतून होत आहे. त्यावर काँग्रेस मात्र अजूनही धिरे चलोच्या मूडमध्ये असल्याचे दिसतेय. जागावाटपाचा एवढ्या लवकर प्रश्नच येत नाही असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटलेय.
’तर कानाखाली आवाज काढेन’
तिकीटासाठी भांडलात तर कानाखाली आवाज काढेन असा दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात महत्त्वाची बैठक आहे. लोकसभा आणि मनपा निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना हा दम दिला.