बिद्री ता. ३१ : बिद्री परिसरात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेघगर्जेनेसह जोरदार वादळी पाऊस पडला. यावेळी वार्याचा वेग जास्त असल्याने शेतातील ऊस पीक भूईसपाट झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. तर बिद्री चौकातील दुकानांवर लावलेले डिजीटल फलक वार्याने उडून गेले. काही ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या मोडून पडल्या तर वार्याने मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत.
गेल्या चार दिवसांपासून वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. प्रचंड उकाड्यामुळे अंगाकडून घामाच्या धारा वाहत असल्याने, सर्वांनाच मोठ्या पावसाची प्रतिक्षा होती. दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वार्याला सुरुवात झाली. तर पाठोपाठ विजांच्या कडकडाटात जोरदार वादळी पाऊस झाला. अर्धा तास पडलेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतातून घराकडे परतणारे शेतकरी, शेतमजूर आणि वाहनधारकांना यामुळे धावपळ करावी लागली.
आजच्या पावसाने नागरिकांची कडाक्याच्या उष्म्यापासून काही अंशी सुटका झाली असली तरी ऊस शेतीला या पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी वार्याने ऊस जमिनदोस्त झाल्याने उत्पन्नात घट होणार आहे. पुढील ऊस हंगामात याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसणार असल्याने शेतकरी आतापासूनच हवालदील झाला आहे.