Spread the love


कोल्हापूर,27 मे
कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाèया टोळीचा पर्दाफाश करताना वर्षातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून तब्बल तब्बल 10 कोटी 74 लाख 10 हजार किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. आंबोली आजरा मार्गावर सापळा रचत उलटी जप्त करताना पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आता आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी सहा महिन्यात चौथ्यांदा व्हेल माशाच्या तस्करीचा डाव हाणून पाडला आहे.
सापळा रचून कारवाई
जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील गवसेत जप्त करण्यात आलेल्या व्हेल माशाच्या उलटीचे वजन 10 किलो 688 ग्रॅम इतके आहे. तस्करी करण्याचा प्रयत्न करणाèया कुडाळमधील पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आजरा पोलिसांना कुडाळमधून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आंबोली आजरा मार्गावर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनात सापळा लावण्यात आला. या मार्गावरून सदर संशयित आरोपी जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यात व्हेल माशाची उलटी मिळाली.
सहा महिन्यात चौथ्यांदा कारवाई
यापूर्वी जानेवारी महिन्यात आजरा तालुक्यातील घाटकरवाडीत आजरा-आंबोली मार्गावर पोलिसांनी सापळा रचून व्हेल माशाची उलटी जप्त केली होती. दोन किलो वजनाची ही उलटी असून याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2 कोटी रुपये इतकी किंमत आहे. आजरा पोलिस व वनविभागाने संयुक्तपणे कारवाई केली होती.
दरम्यान, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर पोलिसांकडून आठवड्यात तब्बल साडे पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली होती. पोलिसांनी सापळा रचून कोल्हापुरात परीख पुलानजीक व्हेल माशांची उलटी घेऊन चाललेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकत 2 किलो 15 ग्रॅम उलटी जप्त करण्यात आली होती. बाजारात याची किंमत तब्बल 2 कोटी 1 लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई करण्यापूर्वी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची 3 किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली होती.