कोल्हापूर,27 मे
डेकोरेशन क्षेत्रात कार्यरत असलेले सहा जण मुंबईला ’लेझर शो’ पाहण्यासाठी गेले होते. प्रदर्शन पाहून ते रात्री अकरा वाजता चारचाकीने कोल्हापूरकडे यायला निघाले. शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी कार घुणकी फाट्याजवळ आली असता रस्त्याच्या कडेने चाललेल्या रोड रोलरला इर्टिका कारचे पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनातील सुयोग पवार, सुनील कुरणे, वैभव चौगुले (रा. टोप), अनिकेत जाधव, निखिल शिखरे, राहुल शिखरे (रा. सर्वजण मिणचे ता. हातकणंगले) हे गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून ’सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, यातील सुयोग पवार आणि सुनील कुरणे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. रोड रोलर चालक दादासो दबडे हे जखमी झाले आहेत.
अंगावर शहारे आणणारे दृश्य: रोड रोलर आणि कार अपघातात रोडरोलर डिव्हायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन पलटी झाले. कारमधील सहा जणांना गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले; मात्र अपघातस्थळी दुखापतग्रस्त सहा जण वेदनेने विव्हळत होते. अपघातात कारचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडलेला असल्याने तेथील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.
वाहतूक विस्कळीत: सातारा कागल राष्ट्रीय महामार्गावर सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदले गेले असून वाहतूक वळविण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर सेवा रस्ते नसल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूरात कारचा अपघात: कोल्हापूरमध्ये शासकीय विश्राम गृह परिसरात एक चारचाकीचा अपघात झाला होता. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या भिंतीला चारचाकी गाडीची धडक लागून हा अपघात झाला. या धडकेत चारचाकीसह येथील बस स्टॉपचा चुराडा झाला आहे. दि. (23 मार्च)रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
कारने घेतला पेट: शासकीय विश्रामगृहाची दगडी भिंत पडली असून अपघात घडताच गाडीने पेट घेतला. कोल्हापूरच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत विद्यार्थ्यांचे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह होते धैर्य प्रसाद हॉलला लागून असलेल्या रस्त्यावर हा अपघात घडला. या अपघातातील गाडीचा (गाडी क्रमांक एमएच 12 एफएन 6549)हा आहे.