कोल्हापुर,27 मे (पीएसआय)
कोल्हापुरात तीन दिवसात दोन भीषण आगीच्या घटना समोर आल्यानंतर कोल्हापूर मनपा प्रशासनाला जाग आली आहे. कोल्हापूर मनपाच्या पथकाकडून पाहणी सुरु करण्यात आल्यानंतर बेकायदेशीर प्रकार समोर आले आहेत. शिवाजी रोड परिसरामध्ये दोन दिवसात महापालिकेच्या परवाना विभागाकडून 31 बेकायदेशीर व्यावसायिकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. परवाना विभागाने पाच कर्मचाèयांचे पथक तयार करण्यात आले आहे. पथकाकडून पाहणी केली जात असताना बेकायदेशीररित्या माल साठवणुकीसह परवाना घेतला जात नसल्याचे समोर आले आहे. शिवाजी रोड तसेच बिंदू चौक या दाटीवाटीच्या भागात पाहणी केली जात आहे.
शिवाजी चौकात सुपर शॉपीत अग्नीतांडव
दरम्यान, कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील मोमीन यांच्या सुपर शॉपी या दुकानात आणि गोदामात 23 मे रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. यामध्ये तब्बल 65 लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला होता. इलेक्ट्रिक वस्तू, खेळणी, कटलरी, प्लास्टिकच्या वस्तू असल्यामुळे तसेच सिलेंडर गळतीने आगीने रौद्ररुप धारण केले होते. तब्बल चार तासांनी आग आटोक्यात आली होती. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी झालेलं आर्थिक नुकसान फार मोठे आहे.
65 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद
या आगीनंतर सुमारे 65 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यामुळे एकंदरीत मोठं नुकसान या आगीमध्ये झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीद अब्दुल रजाक मोमीन यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या शिवाजी रोडवरील सुपर शॉपी व गॅलेक्सी या दुकानांना आग लागली होती. यात बाजूच्या रफिक मोमीन यांच्या इमारतीमधील गाळा, भाडेकरू असलेल्या सारिका बकरे यांच्या झेरॉक्स सेंटरचेही नुकसान झाले आहे. या सर्वांमध्ये विविध इलेक्ट्रिक साहित्य, खेळणी आणि इमारतीमधील लाकडी व लोखंडी साहित्याचे सुमारे 65 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आगीपूर्वी दाभोळकर कॉर्नर सिग्नलजवळ एका इमारतीच्या तिसèया मजल्यावर आग लागली होती. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली होती. दाभोळकर कॉर्नर परिसरात बाजीराव संकुल या इमारतीच्या तिसèया मजल्यावरून दुपारच्या सुमारास आगीचे लोट बाहेर पडताना दिसू लागले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली होती.