Spread the love

जयसिंगपूर/प्रतिनिधी-
कनवाड (ता. शिरोळ) येथे समवशरण विधान व विश्वशांती महायज्ञ सोहळा हजारो श्रावक आणि श्राविकांच्या उपस्थितीत णमोकार मंत्राच्या जयघोषात सुरू आहे. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी कोल्हापूर मठाचे मठाधिपती प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व नांदणी मठाचे मठाधिपती प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे पावन सानिध्य लाभले.
सकाळी मंगल वाद्यघोष, शांती होम, पंचामृत अभिषेक, शांतीधारा, हत्तीवरून मंगलकुंभ आणण्याचा नित्यविधी पार पडला. तब्बल पाच तास समवशरण विधान सभामंडपात संपन्न झाले. या विधानात सौधर्म इंद्र व्दारपाल आरसंगोंडा व धनपती कुबेर डॉ. बाबासो आरसगोंडा यांच्या हस्ते समवशरणावर पुष्पांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना प.पू.लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, भगवंताना शरण जाणे म्हणजे समवशरण होय. भगवंताना केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर समवशरणाची निर्मिती होते. समवशरणात सहभाग नोंदविण्यासारखे दुसरे भाग्य नाही. कारण यामध्ये केलेल्या कर्माचा हिशोब होत असतो. वर्तमान काळात माणूस शाश्वत सुखाच्या मागे धावू लागला आहे. मात्र पुण्याचे बंध नाही तोपर्यंत करू शकत नाही तोपर्यंत सुखप्राप्ती होणार नाही. जैन धर्मात स्वाध्याय महत्वाचा आहे. स्वाध्याच होत नसल्यामुळे समाजात चुकीच्या पद्धती रूढ होत आहेत. त्यास मोडीत काढण्यासाठी आर्ष परंपरेचे पालन होणे आवश्यक आहे. समवशरणात बारा सभा असून त्याचे आदर करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सभा मंडपात प.पु. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, आर्यिका करुणामती माताजी, आर्यिका सुनितीमती माताजी, प.पू. बालाचार्य १०८ श्री जिनसेनजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले.
या महोत्सवास अथणी शुगर्सचे संचालक कौस्तुभ मग्गेन्नावर, शिवलिंग बेळंके (कागवाड), भूपाल गिरमल (अ. लाट), सुभाष मगदूम (शिरटी), सौ. लतिका गोरवाडे (गणेशवाडी), सुकुमार पाटील (किणी), नगरसेविका सौ. सोनाली मगदूम (जयसिंगपूर), महावीर देसाई (म्हैसाळ) या मान्यवरानी भेटी दिल्या. या सर्वांचे कनवाड दिगंबर जैन मंदिर ट्रस्टमार्फत सत्कार करण्यात आला. हत्तीवरून शास्त्र मिरवणुकीत सहभागी होण्याचा मान देवाप्पा रामचंद्र खटावणे यांनी मिळविला. यावेळी मानस्तंभ, भगवान महावीर, भगवान पार्श्वनाथ मूर्तीवर अभिषेक करण्याच्या सवालाची बोली झाली. रात्री जाप्य संगीत आरती आणि उ‌द्याच्या सवालाची बोली झाली.