इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
बेंगलोर येथील आयुर्वेद मेडीकल कॉलेजमध्ये बीएएमएससाठी प्रवेश देतो असे सांगून 14 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधुत कुंभार (मूळ रा. क॥बीड कोल्हापूर सध्या कलानगर), नवीन बी. लिंगायत (रा. बेंगलोर), अरुण गोस्वामी (रा नवी दिल्ली) व बमा पाडा माजी उर्फ समीर (रा. बेंगलोर) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी रशीद दस्तगीर कलावंत (वय 42 रा. गुरुकन्नननगर लिंबू चौक) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी रशीद कलावंत व त्यांचे मित्र जयवंत म्हेतर यांच्या मुलींना बेंगलोर येथील आयुर्वेद मेडीकल कॉलेजमध्ये बीएएमएस साठी प्रवेश मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. प्रवेशासाठी या दोघांकडून उपरोक्त चौघांनी 14 लाख 45 हजार रुपये घेतले. मात्र पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने कलावंत व म्हेतर यांनी सतत त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावर कलावंत व म्हेतर यांनी दिलेल्या 14.45 लाखापैकी संशयितांनी 4 लाख 80 हजार रुपये परत दिले. मात्र अद्यापही 9 लाख 65 हजार रुपये देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे उपरोक्त चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.