कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा
लोकराजा छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने शनिवार दि. ६ मे रोजी सकाळी १० वाजता शाहू मिल कोल्हापूर येथे जत्रा आंब्याची २०२३ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या करण्यात येणार आहे. अशी माहिती पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.
करवीरवासीयांना नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल कोकणातील हापूस आंबा व केशर आंबा उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादकांना सुद्धा योग्य दर मिळावा, यासाठी मागील ३ वर्षापासून कृषी पणन मंडळाच्या वतीने कोल्हापूर शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. सदर उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक
सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे,
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित राहणार आहेत.
हा महोत्सव ६ ते १४ मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरकरांनी या महोत्सवास भेट देऊन आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.