सुधारीत पाणी योजेनेसाठी 62 कोटींचा निधी
खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा
विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगलेकरांच्या मागे लागलेली पाण्याची साडेसाती लवकर संपणार आहे. खासदार धैर्यशील माने, जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांच्या पाठपुराव्याने वारणा नदीवरुन सुधारीत पाणी योजनेसाठी तब्बल 62 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंगळवारी तांत्रिक मान्यता देण्यात आली. याचे हातकणंगलेकरांनी स्वागत केले आहे.
आण्णासाहेब डांगे पाणी पुरवठा मंत्री असताना त्यांनी पुढील 20 वर्षाची वाढीव लोकसंख्या विचारात घेवून हातकणंगले, नेज, बाहुबलीसाठी वारणा नदीवरुन पाणी योजना मंजूर केली होती. सध्या ही योजना कालबहाय्य झाली आहे. त्यामुळे सततच्या गळतीमुळे शहराला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी सुधारीत योजनेचा प्रस्ताव सादर केला होता. शिंदे यांनी यास तत्काळ मान्यता दिली होती. त्यानंतर प्रशासकीय सपोस्कार पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी तांत्रिक मान्यता देण्यात आली.
अशी आहे योजना
एकुण निधी-61.93 कोटी
एकुण लोकसंख्या-13679
प्रती माणसी मिळणारे पाणी -70 लीटर
प्रती माणसी एकुण गरज- 135 लीटर
योजनेवर नियंत्रण- आष्टा नगरपालिका
निधी कमी पडणार नाही
हातकणंगलेकरांनी नेहमीच शिवसेनाला साथ दिली आहे. त्यामुळे भविष्यात येथील सर्व विषय मार्गी लावण्यासाठी माझा प्रय्ात्न आहे. पाणी योजनेसाठी आणखी निधी लागला तर तो उपलब्ध करुन देणार.
- खासदार धैर्यशील माने
टक्केवारीमुक्त काम व्हावं
हातकणंगले नगरपंचायतीचा कारभार केवळ आणि केवळ टक्केवारीवर सुरु आहे. मोबदला मिळाला नाही तर आंदोलन हे आजपर्यंतचं गणित आहे. या प्रकारामुळे अनेक ठेकेदारांनी काम करण सोडून दिलं आहे. हा अनुभव पहाता पाण्यासारख्या पवित्र कामात तरी टक्केवारीसाठी भांडणं होवू नयेत. काम दर्जेदार झालं पाहिजे, ही योजना दीर्घकाळ टिकावी टक्केवारी मुक्त काम कसं होइल याकडे नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी माफक अपेक्षा प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या हातकणंगलेकरांची आहे.
