इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
येथील एका महिलेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र या प्रकरणात पत्नीपासून अलिप्त असलेल्या जावयाची लुडबुड वाढली आहे. या प्रकारामुळे जिल्हा उपनिबंधक पोलीस कार्यालयातील अधिकारी अक्षरश वैतागले आहेत. याचा बंदोबस्त करावा अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.
इचलकरंजीतील कापड व्यापार करणारी एक महिला खासगी सावकारी करत असल्याच्या कारणातून दानोळी येथील संबधित महिलेच्या नात्यागोत्यातील एकाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन हातकणंगलेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्या खासगी सावकार महिलेच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबधीत महिला आणि तिच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकारी यांनी करुन प्रकरण न्यायालयात दाखल केले. मात्र या प्रकरणातील एक कागद गहाळ असल्याची तक्रार या प्रकरणाशी काडीचाही संबध नसलेल्या त्या महिलेच्या जावयाने केली. आणि हा तक्रारदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला. अधिक माहिती घेतली असता सावकरीचा आरोप असलेल्या संबधीत महिलेचा तो जावई असल्याचे समोर आले.
तो या प्रकरणात का हस्तक्षेप करत आहे. याचीही चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आल्याचे कळते. पत्नीला परत मिळवण्यासाठी विविध संघटना आणि लोकशाही मुल्यांचा आधार घेवून तपास यंत्रणेवर दबाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचेही वर्तुळात बोलले जात आहे.
वास्तवीक त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि खासगी सावकारी प्रकरण या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान गहाळ झालेला सदरचा कागद जो तपासी अधिकारी यांनी संबंधित कार्यालयाकडून त्याची सत्यप्रत मिळवून तो गुन्ह्याचे कामी न्यायालयात सादर देखील केला आहे. मात्र अनेक प्रयत्न करुनही पत्नी सोबत येण्यास तयार नाही. म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हेतू साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचेही या निमित्ताने पुढे येत आहे.
