Spread the love

पालकमंत्री इचलकरंजीच्या ‌‘मातोश्रीवर’

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वेगाने हालचाली सुरु झालेल्या आहेत. सोमवारी दुपारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इचलकरंजी येथील ‌‘मातोश्री’वर दाखल झाले. आणि तब्बल 3 तास शिवसैनिकांशी संवाद साधला. आपण ताकदीने लढायचे आहे, तेही महायुती म्हणूनच शिवसेनेची भगवी पताका घेतलेला पहिला महापौर आपल्याला करायचा आहे. यासाठी शिवसैनिकांनी कामाला सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खा.धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री आबिटकर यांनी उपस्थितीत शिवसैनिकांशी निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा केली.
यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके व प्रकाश पाटील यांच्या हस्ते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले, राज्य पातळीवर सध्या तरी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य हे महायुतीतील घटक पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रितपणे लढणार, असे संकेत दिले जात आहेत. काही ठिकाणी तडजोड म्हणून मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. परंतू ही निवडणूक महायुती म्हणूनच आपण लढवायची आहे. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागावे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपंचायती, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात रोजच्या रोज अपडेट घेत आहेत. आपल्या सुचना, मागण्या त्यांच्यापर्यंत पोहचवल्या जात आहेत. आपल्याकडून आलेल्या सुचनांवर शिवसेना नेते गांभीर्याने विचार करुन कार्यवाही करीत आहेत. इचलकरंजी महापालिका आपल्यासाठी महत्वाची आहे. ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आहे.
जागा वाटपात महापौर पदासह जास्तीत जास्त जागा शिवसेनेला कशापद्धतीने मिळतील यासाठी जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. मी आपल्याला आश्वासीत करतो. रविंद्र माने यांच्यासारखा नेता जिल्हाप्रमुख म्हणून आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे सर्वांना न्याय आणि चांगल्या संधी मिळतील. त्यामुळे महापालिकेच्या इमारतीवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकविण्यासाठी आतापासूनच कार्यरत रहावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
खा.धैर्यशील माने म्हणाले, केवळ आणि केवळ आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळेच इचलकरंजी शहराला महापालिकेचा दर्जा मिळाला आहे. यासाठी जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शिंदे साहेबांच्या माध्यमातून येथील अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी भरीव निधी खेचून आणण्याचे काम करण्यात आले आहे. आगामी महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे निश्चितपणे रविंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भगवा फडकेल, असा मला विश्वास आहे.
यावेळी शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे, माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते, महादेव गौड, चंद्रकांत शेळके, प्रकाश पाटील, इकबाल कलावंत, रविंद्र लोहार, मोहन मालवणकर, वैशालीताई डोंगरे, स्नेहांकिताताई भंडारे, जोत्स्नाताई भिसे, रुपालीताई चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविंद्र माने यांचा यथोचित सन्मान होणार


जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, वाळवा, शिराळासह इचलकरंजी शहरात यंत्रणा गतीमान करुन काम केले. इचलकरंजीत मिळालेले मताधिक्य हे कधीही विसरले जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. कदाचित महापालिका निवडणूक आचार संहितेपूर्वीच त्यांचा यथोचित सन्मान होईल, असा विश्वास पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.