Spread the love

कन्या महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात संपन्न.

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथील मराठी विभाग आणि जिल्हा मराठी भाषा समिती, कोल्हापूर  यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक माननीय श्री. युवराज मोहिते, सहाय्यक शिक्षक गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी हे उपस्थित होते.

 त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थिनींना ओघवत्या व  अभ्यासपूर्ण वाणीतून मराठी साहित्य, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, मराठी भाषेचे वास्तव आणि आव्हाने व जबाबदाऱ्या यांविषयी  विवेचन केले. आपणच आपली मराठी भाषा जपली पाहिजे, व्यवहारात ती वापरली पाहिजे आणि त्यासाठी मराठी भाषेमध्ये अक्षय्य साहित्याची निर्मिती होणे आवश्यक आहे व ही आपली साहित्यिकांची व मराठी भाषिकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले.

      महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दर बारा कोसांवर  भाषा बदलते, त्यामुळे कोणतेही भाषा छोटी व मोठी नसते तर प्रत्येक भाषा ही तितकीच महत्त्वाची आहे, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे, ती जपली पाहिजे, रुजवली आणि वाढवली पाहिजे असे सांगितले.

   मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिता आंबोकर यांनी प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यामागील भाषा तज्ञ व भाषा संशोधकांची भूमिका स्पष्ट करून मराठीचे अभिजातपण स्पष्ट केले. 

यावेळी गुणवंत गुरुदेव कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. त्रिशला कदम, प्रा.  सुधाकर इंडी, प्रा. डॉ. धीरज शिंदे यांनी  विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.

        या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख सोनाली बोरगावकर, तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पैलवान यांनी केले तर आभार डॉ. प्रियांका कुंभार यांनी मानले.