बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक बदल :
क्लिअरिंगची नवी सुविधा सुरू
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
बँकिंग व्यवहारातील महत्वाचा टप्पा मानला जाणारा चेक क्लिअरिंग आता अधिक वेगाने होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून दुपारी १ वाजण्यापूर्वी भरलेले चेक त्याच दिवशी संबंधित खात्यात जमा होतील. या ऐतिहासिक निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात विशेष म्हणजे, आरबीआयने सुरुवातीला तांत्रिक कारणांमुळे हा प्रस्ताव नाकारला होता. मात्र दोन-तीन वेळच्या चर्चेनंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर रिझर्व्ह बँक तयार झाली. तांत्रिक अपग्रेडेशन, लहान बँकांचा विरोध अशा अडचणींवर मात करत हा निर्णय मार्गी लागला आहे.
या उपक्रमाची पहिली फेज १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे, तर दुसरी फेज ३ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तासाला चेक क्लिअरिंग होणार असून, जास्तीत जास्त तीन तासांत खात्यात रक्कम जमा होणार आहे.
या निर्णयामुळे देशातील बँकिंग क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून येईल आणि ग्राहकांना त्वरित सेवा मिळणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
