माणुसकीची भिंत उपक्रमाला इचलकरंजीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यंकटराव हायस्कूलसमोर सुरू झालेल्या या उपक्रमाला शनिवारी सकाळपासून मोठी गर्दी दिसून आली.
गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळी सणाच्या काळात मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी वापरण्यायोग्य जुने कपडे, खेळणी, भांडी आणि इतर घरगुती वस्तू दान केल्या. “नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या” या मानवतेच्या संदेशाला इचलकरंजीकरांनी मनापासून प्रतिसाद दिला आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. या वर्षीही नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमात व्हिजन इचलकरंजीचे कौशिक मराठे, महावीर भन्साळी, अमित कुंभार, इराण्णा सिंहासने, सुधीर सादळे, राजेश व्यास, अनुप हळ्याळकर आदींसह सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि व्यंकटराव हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाचे सहकार्य दिले.
माणुसकीची भिंत हा उपक्रम रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, दानशूर नागरिकांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

