Spread the love

इचलकरंजी महान कार्य वृत्तसेवा
संस्थेच्या वतीने येत्या सहा महिन्यात आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क हा राज्यातील नव्हे तर देशातील अव्वल स्थानावरील पार्क असेल आणि टेक्स्टाईल पार्क कसा असावा याचे उत्तम उदाहरण असेल, असा विश्‍वास चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी व्यक्त केला.
कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून चेअरमन प्रकाश दत्तवाडे बोलत होते. याप्रसंगी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, क. आ. इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे, प्रसाद खोबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. स्वागत करून प्रास्ताविकात चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञान असलेला हा महत्वाकांक्षी टेक्स्टाईल पार्क साकारण्यात आला आहे. सध्या 133 युनिटचे प्रत्यक्षात उत्पादन सुरु असून 20 अतिरिक्त युनिटचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या सहा महिन्यात प्रत्यक्ष उत्पादनास सुरू होईल. शासनाकडून प्राप्त अनुदानातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले.
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, अत्याधुनिक यंत्रणा असलेला हा टेक्स्टाईल पार्क असून याठिकाणी तसेच इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर याठिकाणी उत्पादीत होणार्‍या सर्वच प्रोडक्टचे दिवाळीनंतर निर्यात र्यात प्रदर्शन भरण्याची सूचना करताना आपले उत्पादन जगासमोर आणुया, असे सांगितले. वस्त्रोद्योगातील मालक आणि कामगार हा संघर्ष संपला असल्याचे नमुद करताना वस्त्रोद्योगात नव्याने येणार्‍या कामगारांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे या क्षेत्रात महिलांना प्रशिक्षित करण्याची गरज व्यक्त केली. तसेच कॉमन फॅसिलिटी सेंटर व कामगार ट्रेडींग सेंटर इमारतीचे काम दिवाळीनंतर तातडीने पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेचे कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दर्शवली. आभार संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब कलागते यांनी मानले. सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले.
याप्रसंगी सुभाष बेलेकर, सुधाकर खोंद्रे, प्रकाश व्यास, पुरुषोत्तम चितलांग्या, मुरलीमनोहर तोतला, ओंकार मेटे, दादासी पाटील, अहमद मुजावर, बाबासो चौगुले, शेखर शहा, चंद्रकांत पाटील, सुनिल पाटील, श्रीरंग खवरे, सी. सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, आनंदा कोरे, नंदू पाटील, संचालक सर्वश्री सर्जेराव पाटील, रमेश कबाडे, महावीर यळरूटे, नरसिंह पारीक, चंद्रकांत इंगवले, महादेव कांबळे, सौ. शकुंतला जाधव, श्रीमती सुवर्णा पाटील आदींसह सभासद, उद्योजक उपस्थित होते.