Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
बाजारातील आर्थिक चढउतार, मंदी, व्यवहारात लागणारी रोकड उपलब्धता तसेच प्रोसेसिंगसाठी लागणार्‍या कच्या मालाच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत झालेल्या दरवाढीचा दि लक्ष्मी को.ऑप. प्रोसेसर्स संस्थेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तरीही सर्व तरतुदी वजा जाता संस्थेला ३२ लाख ८ हजार ८८१ रुपये निव्वळ नफा झाला आहे. संस्था गेल्या ८ वर्षांपासून नफ्यात असल्याचे संस्थेचे चेअरमन मुकुंद फाटक यांनी सांगितले. संस्थेच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.चेअरमन फाटक यांनी संस्थेला मागील वर्षाच्या तुलनेत २०२४-२०२५ हे आर्थिक वर्ष व्यवसायाच्या बाबतीत संमिश्र स्वरुपाचे गेले. २०२३-२०२४ या वर्षात १२ कोटी ७७ लाख ५ हजार ८३९ रुपयांचे उत्पादन झाले होते. अहवाल सालात त्यात वाढ होऊन १३ कोटी ३८ लाख १७ हजार ६९८ रुपयांचे उत्पादन झाले आहे. संस्थेचे एकूण भाग भांडवल २ कोटी २० लाख ६५ हजार रुपये झाले असून सभासद संख्या ३ हजार ८६१ आहे. संस्थेस २०२४-२०२५ मध्ये ८६ लाख ९१ हजार १७२ रुपये ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी वजा जाता ३२ लाख ८ हजार ८८१ रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. प्रारंभी संस्थेचे व्हा.चेअरमन राजाराम लोकरे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे इंजिनिअरिंग क्षेत्रातील जेष्ठ व्यावसायिक डी.एम.बिरादार आणि राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेचे नेते शामराव कुलकर्णी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे आणि विशेष कार्य करणार्‍या संस्थेच्या सभासद, हितचिंतकांचा सत्कार करण्यात आला. संचालक सतीश बुरसे यांनी उपस्थितांचे आभार मानल्यावर वंदे मातरमने सभेची सांगता झाली. सभेस संस्थेचे संचालक उमेश कुलकर्णी, सर्जेराव पाटील, मधुकर पाटील यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.