इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
÷सात वर्षापूर्वी हुपरी-बोरगांव रोडवर ट्रक अडवून 22 टन लोखंडी सळी लंपास केल्याच्या आरोपातून एस. बी. गँगमधील संशयित सनी बगाडे, मनिष सांगावकर, सनी मोहिते यांच्यासह 10 जणांची येथील मोका न्यायालयाचे न्या. मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्या वतीने अॅड. मेहबूब बाणदार व अॅड. सुनील कुलकर्णी यांनी काम पहिले.
या घटनेची पार्श्वभूमी अशी, 17 जानेवारी 2018 रोजी हुपरी-बोरगाव या रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास 22 टन लोखंडी सळी घेऊन जाणारा ट्रक संशयितांनी अडवला. आणि ट्रक ड्रायव्हर व त्याचे सोबतीचे अपहरण करून दुसर्या ट्रकच्या सहाय्याने 22 टन सळी लंपास केल्याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर प्रवीण भीमराव जाधव यांनी 18 जानेवारी रोजी हुपरी पोलीस स्टेशनात फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने संशयित सनी बगाडे, साजिद नाईक, अभिजित संकपाळ, रियाज हैदर, दिपक सावंत, किरण बगाडे, अक्षय भोसले, मनीष सांगावकर, सुखदेव डावरे, सनी मोहिते या 10 संशयितांना दरोडा, अपहरण या कलमाखाली अटक केली होती. त्यानंतर एस. बी बॉयस नावाची टोळी या आरोपावरून मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पुणे येथील विशेष न्यायालयातून सदर खटला इचलकरंजीतील विशेष मोका न्यायालयात वर्ग करण्यात आला. या खटल्याची सुनावणी 23 ऑक्टोबर 2024 पासून इचलकरंजी विशेष मोका न्यायालयात झाली. सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. तथापि संशयितांचे वकील अॅड. मेहबूब बाणदार व अॅड. सुनील कुलकर्णी यांनी घेतलेल्या उलट तपासात कलम 18 नुसार मोका कायद्यातील कबुली जबाब सिद्ध झाला नाही, एस. बी. बॉयज नावाची गँग अस्तित्वात असल्याचा पुरावा नाही, दरोड्याची घटना, पंचनामे सिध्द होऊ शकले नाही, जबाबात विसंगती आहे असे मुद्दे मांडले. त्याचबरोबर त्यांनी उच्च न्यायालय मुंबई यांनी मोहम्मद शेख वि महाराष्ट्र सरकार या खटल्यात दिलेले दिशादर्शक मुद्दे सिद्ध झालेले नाहीत कबुली जबाब हा कायदेशीर नाही यासह ओळख परेडवर प्रश्न चिन्ह उभा केले. सदर युक्तिवाद व कोर्टासामोरील पुरावा ग्राह्य मानून विशेष मोका न्यायालयाने सर्वच संशयितांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. सदर कामी अॅड. मेहबूब बाणदार यांना अॅड. रचना पाटील, अॅड. साक्षी घोरपडे, अॅड. शितल शिरढोणे, अॅड. अश्पाक देसाई, अॅड. प्रसन्ना कुलकर्णी व अॅड. देवांशिष बोहरा यांनी सहाय्य केले.
