Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
येथील दातार मळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक एस. जी. चव्हाण यांनी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी मुख्याध्यापिका झालेल्या रूद्रा नाधवडेकर हिच्या शुभहस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेच्या काही विद्यार्थिनींनी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक शिक्षिका झालेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी दिवसभरामध्ये आलेले अनुभव त्यांनी कथन केले. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक एस. एस. वारके यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरित्राचा आढावा घेऊन समाजातील शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. दिवसभरामध्ये एक दिवसाची मुख्याध्यापिका म्हणून आलेले अनुभव कुमारी रुद्रा नाधवडेकर हिने व्यक्त केले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय एस. जी. चव्हाण यांनी प्रशालेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्याचा उद्देश व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका झालेल्या कु. संजना कोटगी व कु. समृद्धी कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी शिक्षिका कुमारी जरीन पठाण हिने केले. कार्यक्रमासाठी हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.