मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मनोज जरांगेंना पाठींबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यातच आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा, असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. आता मराठा आंदोलनावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही. मराठा आंदोलक वाऱ्यावर आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधलाय. रोहित पवार म्हणाले की, मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का? गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर 10-10 मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय? एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, आंदोलक युवांना विनंती आहे ‘चुकुनही चूक करू नका’ कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केवळ संधी शोधत आहे. सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत. सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.
