Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाच दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबवण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने मुंबई पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस मनोज जरांगे पाटील यांना बजावली आहे. यापूर्वी ही नोटीस मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे 2 सप्टेंबर रोजी दुपारी काही पोलीस अधिकारी ही नोटीस स्वत: घेऊन थेट आझाद मैदानात दाखल झाले. सर्वप्रथम ही नोटीस मराठा समाजाच्या वकिलांना दाखवण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी व्यासपीठावर गेले आणि झोपेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना जागे करून त्यांच्या हातात ही नोटीस देण्यात आली. मुंबई पोलिसांनी आझाद मैदान खाली करण्याची नोटीस देताच मराठा समाजाने मोठा निर्णय घेतला असून तातडीने मराठा आंदोलकांना संदेश पाठवले आहे.

विरेंद्र पवारांचा मराठा आंदोलकांना संदेश

मराठा आंदोलनाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी म्हटले आहे की, मला आणि मनोज जरांगे पाटील यांना ही नोटीस आलेली आहे. कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. तशा सूचना आम्ही मराठा बांधवांना दिलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी देखील सूचना दिल्या आहेत.  खाण्याच्या गाड्या वाशी येथे थांबवा. मुंबईत आणू नका. सध्या खाण्याचा आणि पाण्याचा मोठा साठा आहे. वाशी येथे ही सामन ठेवण्यासाठी सोय केली आहे, असा संदेश त्यांनी यावेळी मराठा बांधवांना दिला आहे.

मुंबई पोलिसांच्या नोटीसला कोर्टात आव्हान देणार दरम्यान, विरेंद्र पवार यांनी मुंबई पोलिसांच्या नोटीसला आम्ही कोरत आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. विरेंद्र पवार म्हणाले की, नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलेले आहे की, आम्ही जे अर्ज केले होते ते अमान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे आता परवानगी नाही. तुम्ही ताबडतोब आझाद मैदान खाली करा, असे म्हटले आहे. आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आम्ही तिथे यावर उत्तर देऊ. पुन्हा परवानगी मिळवण्याचा अर्ज आम्ही करू. मनोज जरांगे पाटील यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. आमचे वकील कोर्टात आहेत. ते या संदर्भात कोर्टात आव्हान देणार आहेत, असे विरेंद्र पवार यांनी सांगितले.