Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदान तत्काळ रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी यावर प्रत्युत्तर देत सरकारलाच इशारा दिला आहे. ”मराठा-कुणबी हे एकच समाज असून त्यांचा जीआर आणि हैदराबाद गॅझेट लागू होईपर्यंत ते आझाद मैदान सोडणार नाहीत,” असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

‘फडणवीसांनी मराठ्यांवर अन्याय होऊ देऊ नये’ : जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज मंगळवार (2 सप्टेंबर) पाचवा दिवस आहे. निजर्ळी उपोषण सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. आझाद मैदान सोडण्याबाबत नोटीस मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे म्हणाले, ”न्यायदेवता आमच्या बाजूनं आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही वाहनं हटवली असून ट्रॅफिकची समस्या नाही. आम्ही शांततेनं आंदोलन करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शांत राहू द्यावं. मराठ्यांवर अन्याय होऊ देऊ नये, आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, मेलो तरी मागं हटणार नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.

जरांगे पाटलांनी आज काय सांगितलं?

    सरकारनं आधी हैदराबाद गॅझेट लागू करावं

    आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे

    सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही

    आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यास महागात पडेल

    आझाद मैदानातून हूसकून लावल्यास महागात पडेल

    फडणवीस साहेब आम्ही शांत आहोत शांत राहू द्या

    शनिवार आणि रविवारी आंदोलक मुंबईत आले तर छान होईल

‘शनिवार-रविवारी मराठे मुंबईत आले तर…’ : मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं, ”शनिवार-रविवारी मराठे मुंबईत आले तर सोमवारी आंदोलन अधिक तीव्र होईल. शंभर किंवा लाख पोलीस आले तरी आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. मराठ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाही. मराठ्यांची संख्या मोठी आहे, गोरगरीब मराठ्यांना न्याय द्या. अन्यायाचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘फडणवीस खोटी माहिती देऊन कुटील डाव खेळत आहेत’ : मनोज जरांगे म्हणाले, ”आम्ही सुरुवातीपासूनच सरकारसोबत चर्चेस तयार आहोत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान गॅझेटच्या अंमलबजावणीमध्ये काय अडचण आहे? चार गॅझेटपैकी दोन गॅझेटचा अभ्यास अजून बाकी आहे. मराठा समाजाला चंद्र-सूर्य जितका काळ टिकेल तितकाच न्याय मिळावा, ही आमची अपेक्षा आहे. मात्र, फडणवीस खोटी माहिती देऊन कुटील डाव खेळत आहेत. त्यांनी मराठ्यांवर अन्याय करू नये. आम्ही कोणतेही नियम मोडलेले नाही. सीएसएमटी आणि मुंबई पालिका परिसर रिकामा केला आहे. न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही,” असं जरांगेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.